…म्हणून गडचिरोली जिल्ह्यातील शेतकऱ्यांना दिवसा 12 ऐवजी 8 तास वीजपुरवठा

लवकरच पुन्हा 12 तास वीज मिळणार

देसाईगंज : उपमुख्यमंत्री तथा उर्जामंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सूचनेनुसार आरमोरी मतदार संघासह गडचिरोली जिल्ह्यात कृषि पंपांना दिवसा 12 तास वीज पुरवठा सुरु होता. परंतु राज्यात अचानक 1 हजार मेगावॅट विजेची मागणी वाढल्याने महावितरणकडून 8 फेब्रुवारी 2024 पासून कृषिपंपांना 12 ऐवजी 8 तास वीज पुरवठा केला जात आहे. दरम्यान आ.कृष्णा गजबे यांनी यासंदर्भात पालकमंत्री फडणवीस यांच्याकडे कैफियत मांडल्यानंतर त्यांनी लगेच महावितरणच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांशी संपर्क केला. त्यांनी अतिरिक्त विजेच्या मागणीची समस्या निर्माण झाल्याचे कारण सांगत दोन-तीन दिवसात पुन्हा 12 तास वीज देणे सुरू करणार असल्याचे स्पष्ट केले.

12 ऐवजी 8 तास वीज पुरवठा सुरू झाल्याने आरमोरी मतदार संघासह गडचिरोली जिल्ह्यात रबी / उन्हाळी धान पिक व भाजीपाला उत्पादक शेतकरी पुन्हा संकटात सापडले. कृषि पंपांना पुर्ववत 12 तास वीज पुरवठा करण्यासाठी आ.गजबे यांनी मुंबई गाठत ना.फडणवीस यांच्याकडे धाव घेतली आणि शेतकऱ्यांसाठी हा विषय किती गंभीर आहे याची कल्पना दिली. आदिवासी, दुर्गम व नक्षलग्रस्त गडचिरोली जिल्ह्यातील शेतकऱ्यांची व्यथा निदर्शनास आणून दिली. त्यावर ना.फडणवीस यांनी लागलीच महावितरणच्या वरीष्ठ अधिकाऱ्यांना दुरध्वनीद्वारे संपर्क केला.

शासनाचे कोणतेही आदेश नसताना गडचिरोली जिल्ह्यात 8 तास वीज पुरवठा का करण्यात येत आहे, अशी विचारणा केली. त्यावर महावितरण अधिकाऱ्यांनी त्यांची समस्या सांगत वाढलेल्या विजेच्या मागणीचे नियोजन करण्यासाठी 8 ते 10 दिवसांच्या कालावधीसाठी 12 तास वीज पुरवठा स्थगित करण्यात आला, परंतू येत्या 2 ते 3 दिवसात पूर्वीप्रमाणे 12 तास वीज पुरवठा करण्यात येईल, असे सांगितले. तसा शब्द फडणवीस यांनी आ.गजबे यांना दिला.