गडचिरोली : गडचिरोलीत लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहात असलेल्या जोडप्यामध्ये झालेल्या वादात प्रेयसीने गळफास घेऊन आत्महत्या केली. याची माहिती मिळताच प्रियकरानेही किटकनाशक घेऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला आहे. ही घटना शहरातील फुले वॅार्डात घडली.
सुवर्णा ऋषी कोटेवार असे विवाहित प्रेयसीचे नाव असून ती चंद्रपूर जिल्ह्यातील रहिवासी होती. ती पती आणि ६ वर्षाच्या मुलाला सोडून काही दिवसांपासून गडचिरोलीच्या फुले वॅार्डमध्ये भाड्याने राहात होती. तिच्याच खोलीत तिचा प्रियकरही राहात होता. सुवर्णा ऋषी कोटेवार असे मृत प्रेयसीचे नाव आहे तर चेतन मोरेश्वर बावणे असे प्रियकराचे नाव असून तो चामोर्शी तालुक्यातील मुधोली चक येथील रहिवासी आहे. परंतू तो गेल्या दोन महिन्यांपासून सुवर्णासोबत लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहात होता. पोलिस भरतीच्या निमित्ताने या दोघांची ओळख झाली होती आणि त्यांचे सूत जुळले.
काही कारणावरून दोघांमध्ये वाद झाला होता. त्यामुळे चेतन आपल्या गावी गेला होता. यादरम्यान सुवर्णाने फुले वॅार्डमधील आपल्या खोलीत गळफास लावून घेतला. तिच्या मृत्यूची बातमी कळताच प्रियकर चेतन यानेही किटकनाशक घेऊन आत्महत्येचा प्रयत्न केला. त्याच्यावर गडचिरोलीत जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार सुरू आहे.
गडचिरोली पोलिस या प्रकरणाचा सखोल तपास करीत आहे. प्रियकर अद्याप शुद्धीवर आला नसल्यामुळे त्याचे बयाण होऊ शकले नसल्याचे पोलिस निरीक्षक अरुण फेगडे यांनी सांगितले.