गडचिरोली : स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधून उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गडचिरोली पोलीस दलातील विविध विकास कामांचे उद्घाटन केले. प्राणहिता पोलीस उपमुख्यालयात राष्ट्रपती शौर्य पदक जाहीर झालेल्या जिल्ह्यातील ३३ पोलीस अधिकारी-अंमलदारांचा त्यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. याशिवाय सुरजागड येथे नवीन प्रशासकीय इमारत तसेच पुरुष व महिला अंमलदारांसाठी बनविलेल्या बॅरेकचे उद्घाटन त्यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी अन्न व औषध प्रशासनमंत्री धर्मरावबाबा आत्राम, खासदार अशोक नेते, लाॅयड्स मेटल्सचे संचालक बी.प्रभाकरन प्रामुख्याने उपस्थित होते. जिल्ह्यातील अतिदुर्गम भागात उभारण्यात आलेल्या पोलीस मदत केंद्र पिपली बुर्गी व कसनसूरच्या हद्दीतील आदिवासी बांधवांना बांडे नदीवरुन ये-जा करण्यासाठी अडचणी निर्माण होत होत्या. याकरीता गडचिरोली पोलीस प्रशासनाच्या पाठपुराव्याने नदीवरील कोठी व कोरनार या दोन गावांना जोडणारा तसेच शेवारी या ठिकाणचा पुल उभारण्यात आला. या दोन्ही पुलांना अनुक्रमे क्रांतीवीर बाबूराव शेडमाके कोठी-कोरनार पुल व क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले शेवारी पूल असे नाव देण्यात आले. या दोन्ही पुलांच्या उभारणीमुळे छत्तीसगड सीमेलगत असलेल्या १७ गावांतील ५००० पेक्षा अधिक नागरिकांना फायदा होणार आहे. पावसाळ्यात ४ ते ५ महिने संपर्क तुटणाऱ्या गावांना आता बारमाही रहदारी मिळून या भागातील आदिवासी बांधवांना विकासाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी मदत होणार आहे.
सुरजागड येथे उभारण्यात आलेल्या लॉयड्स मेटल्स कंपनीच्या मॉडेल डिस्प्ले सेंटरला ना.फडणविस यांनी भेट दिली. तसेच सदर ठिकाणी नवीन प्रशासकिय ईमारतीचे उद्घाटन करून मायनिंग प्लॅनचे अवलोकन केल्यानंतर त्यांनी नागरिकांना संबोधित केले. गडचिरोली जिल्ह्याच्या आधुनिकीकरणासाठी व औद्योगिकीकरणासाठी आम्ही प्रयत्नशिल असून, दुर्गम अतिदुर्गम अशा नक्षलग्रस्त भागाचा विकास व्हावा व येथील जनता जास्तीत जास्त प्रगत व्हावी, तसेच मुख्य प्रवाहात यावी यासाठी आम्ही प्रयत्न करीत आहोत, असे सांगून आपल्या सर्व अडीअडचणी सोडविण्याचा आम्ही प्रयत्न करू, असेही त्यांनी सांगितले.
या विविध कार्यक्रमांसाठी ना.धर्मरावबाबा आत्राम, खासदार अशोक नेते, आ.डॅा.देवराव होळी, आ.कृष्णा गजबे, माजी पालकमंत्री अंब्रिशराव आत्राम, पोलीस उपमहानिरीक्षक संदीप पाटील, जिल्हाधिकारी संजय मीना, पोलीस अधीक्षक नीलोत्पल, अपर पोलीस अधीक्षक (अभियान) अनुज तारे, अपर पोलीस अधीक्षक (प्रशासन) कुमार चिंता, अपर पोलीस अधीक्षक (अहेरी) सतीश देशमुख, सा.बां.विभागाच्या अधीक्षक अभियंता नीता ठाकरे उपस्थित होत्या.