अहेरी : अहेरी पंचायत समितीअंतर्गत येणाऱ्या राजपूर पॅच ग्रामपंचायतच्या ग्रामसेवकाने १५ व्या वित्त आयोगाच्या निधीत पदाधिकाऱ्यांना विश्वासात न घेता गैरव्यवहार केल्याचा आरोप ग्रामपंचायत सदस्यांनी केला आहे. त्यामुळे ग्रामसेवक आय.आर.दर्रो यांची बदली रद्द करून त्यांच्या कार्यकाळात झालेल्या कामांची सखोल चौकशी करावी नंतरच दर्रो यांची बदली करावी अशी मागणी सदस्यांनी मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना निवेदन देऊन केली.
निवेदनात नमूद केल्यानुसार ग्रामसेवक दर्रो हे गेल्या २० सप्टेंबर २०२२ रोजी राजपूर ग्रामपंचायतचे प्रभारी सचिव म्हणून रुजू झाले होते. तेव्हापालून ते नेहमी गैरहजर राहा होते. ग्रामपंचायतचा संपूर्ण दस्तावेज ते नागेपल्ली येथे घेतलेल्या भाड्याच्या खोलीत ठेवत होते. त्यामुळे मासिक सभेत कोणत्याही जमाखर्चाच्या लेखाजोख्याचे वाचन केले जात नव्हते. त्यामुळे प्रत्येक वेळी मासिक सभा रद्द केली जात होती. गेल्या तीन महिन्यांपासून मासिक सभा तर ९ महिन्यांपासून ग्रामसभा झाली नाही. उडवाउडवीची उत्तरे देऊन ग्रामसेवक मासिक सभेला गैरहजर राहात होते. सतत गैरहजर राहात असल्याने नागरिकांनी अनेक कामेही अडलेली होती.
योजनांच्या निधी खर्चाबाबत सदस्यांना विश्वासात न घेता विविध योजना कागदावरच ठेवून निधीची अफरातफर केल्याचा संशय सदस्यांनी व्यक्त केला. अशा स्थितीत संपूर्ण कारभाराची चौकशी करून ग्रामपंचायतचा लेखाजोखा पारदर्शक होईपर्यंत ग्रामसेवकाची झालेली बदली रद्द करून दोषींवर कारवाई करावी, अशी मागणी ग्रामपंचायत सदस्य ज्योती तलांडे, सुमित्रा वासेकर, मनिषा नरेश आत्राम, सुरेश गंगाधरीवार, संतोष पंदीलवार, शंकर सीडाम यांनी केली आहे.