जिल्ह्यातील ४१ राईस मिल मालक भरणार का २.६७ कोटींचा दंड?

धान भरडाईतील गैरव्यवहार प्रकरण

गडचिरोली : शेतकऱ्यांकडून आधारभूत किमतीनुसार खरेदी केलेल्या शासकीय धानाच्या भरडाईत गैरव्यवहार झाल्याचा ठपका ठेवत जिल्ह्यातील ४१ राईस मिल मालकांवर एकूण २.६७ कोटी रुपयांचा दंड जिल्हाधिकाऱ्यांनी ठोठावला. पण एेन धान खरेदीच्या या हंगामात राईस मिलर्स हा दंड भरणार का, असा प्रश्न निर्माण झाला आहे. याशिवाय नवीन धानाच्या भरडाईसाठी पुन्हा याच मिलर्सला काम द्यावे लागण्याची शक्यता असल्याने नवीन पेच निर्माण होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

गेल्यावर्षीच्या धान खरेदीच्या हंगामात आदिवासी विकास महामंडळाकडून उचल केलेल्या धानाची जिल्ह्याबाहेर विक्री करून त्याएेवजी निकृष्ट दर्जाचा तांदूळ शासकीय गोदामात जमा करून गैरव्यवहार केल्याचा ठपका महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालकांनी नेमलेल्या समितीने ठेवला होता. यानंतर जिल्हाधिकाऱ्यांनी ४१ राईस मिल मालकांना गेल्या महिन्यात २ कोटी ६७ लाखांचा दंड ठोठावला.

या दंडाची रक्कम राईस मिल मालकांच्या गेल्यावर्षीच्या भरडाई व वाहतूक बिलातून वसुल करण्याचे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांनी आदिवासी विकास महामंडळाच्या प्रादेशिक व्यवस्थापकांना दिल्याचे समजते. परंतू या कारवाईमुळे यावर्षीच्या धान भरडाईसाठी नवीन समस्या तर निर्माण होणार नाही ना? अशी शंकाही संबंधितांकडून व्यक्त केली जात आहे.