आरोग्य सहसंचालक डॉ.सारणीकर यांनी घेतला कीटकजन्य आजारांचा आढावा

हिवताप रुग्णसंख्येतील घटीसाठी समाधानी

गडचिरोली : राज्याच्या आरोग्य विभागाचे सहसंचालक (हिवताप व हत्तीरोग) डॉ.प्रतापसिंह सारणीकर व त्यांच्या चमुने रविवारी गडचिरोली जिल्ह्याचा दौरा केला. यावेळी त्यांनी जिल्हा हिवताप कार्यालय, तसेच धानोरा तालुक्यातील मुरूमगाव व गोडलवाही आरोग्य केंद्राला भेटी देऊन कीटकजन्य आजारांचा आढावा घेतला.

गडचिरोली जिल्हा राज्यात कीटकजन्य आजारांसाठी संवेदनशील जिल्हा म्हणून ओळखला जातो. या जिल्ह्यातील कीटकजन्य आजारांवर नियंत्रण व प्रतिबंध राहण्याकरिता डॉ.सारणीकर व त्यांच्या चमुने पाहणी करून सूचना केल्या. आरोग्य कर्मचाऱ्यांना येणाऱ्या काळामध्ये हिवताप प्रतिबंधात्मक उपाययोजना अधिक गतिमान करणे, जिल्ह्यातील आयडीएसपी, साथरोग यासंदर्भात हिवताप व हत्तीरोग विभागातील कर्मचाऱ्यांना मार्गदर्शक सूचना दिल्या. तसेच दरवर्षीपेक्षा या वर्षातील हिवताप रुग्णांच्या संख्येत घट झाल्याबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केले.

या भेटीत राज्यस्तरीय चमुने कीटकजन्य आजाराविषयी कर्मचाऱ्यांना मार्गदर्शन केले. या चमुत डॉ.प्रदीप आवटे, डॉ.सोळंकी, डॉ.जगताप, महेश शिंदे, सुनील राठोड, तसेच जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.दावल साळवे, डॉ.विनोद मशाखेत्री, डॉ.हुलके व जिल्हा हिवताप अधिकारी डॉ.कोटवार, आरोग्य पर्यवेक्षक अशोक एडलावार, कार्यालयीन अधीक्षक संतोष भार्गवे आदी उपस्थित होते.