शहीद पोलिस जवानांच्या कुटुंबियांसोबत पोलिस अधीक्षक नीलोत्पल यांची दिवाळी

फराळ आणि मिठाई वाटत साधला संवाद

गडचिरोली : नक्षलविरोधी अभियानात प्राणाची आहुती देणाऱ्या पोलिसांच्या कुटुंबियांना दिवाळीसारख्या सणाच्या निमित्ताने आपल्या कुटुंबप्रमुखाची कमतरता जाणवू नये, या भावनेतून पोलिस अधीक्षक नीलोत्पल यांनी जिल्ह्यातील शहीद पोलिसांच्या कुटुंबियांसोबत आस्थेने संवाद साधत त्यांना दिवाळीचा फराळ आणि मिठाईचे वाटप केले. यावेळी शहीद कुटुंबियांच्या समस्याही त्यांनी जाणून घेतल्या.

जिल्ह्याच्या स्थापनेपासून आजपर्यंत गडचिरोली पोलिस दलातील 212 पोलिस अधिकारी आणि अंमलदारांना नक्षलवाद्यांशी लढताना वीरमरण आले. या कामगिरीत 212 वीर जवानांपैकी 169 (5 वीर महिला जवानांसह) वीर जवान हे गडचिरोली जिल्ह्याचे रहिवासी, तर 43 जवान राज्य राखीव पोलिस दल, केंद्रीय राखीव पोलिस दल, भारतीय राखीव दल, इंडो तिबेटीयन बॉर्डर पोलिस दल आणि राज्य गुप्तवार्ता विभाग या सुरक्षा दलातील आहेत.

दिवाळी सणानिमित्त दरवर्षीप्रमाणे यावर्षीही गडचिरोली पोलिस दलाकडून शहिद जवानांच्या कुटुंबियांच्या समस्या जाणुन घेण्याकरिता संवाद बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी पोलिस अधीक्षक म्हणाले, गडचिरोली पोलिस दलात कार्यरत असताना पोलिस जवान नेहमी आपल्या कुटुंबियांपासून दूर राहून आपले कर्तव्य बजावत असतात. जेव्हा एखादा जवान शहिद होतो त्यावेळेस त्याच्या कुटुंबियांना अनेक अडचणींना तोंड द्यावे लागते. गडचिरोली पोलिस दल सतत त्यांच्या समस्या सोडविण्याचा प्रयत्न करत असते. आम्ही नेहमीच त्यांच्या पाठिशी राहू, असे सांगितले.

सदर कार्यक्रमाकरिता पोलिस अधीक्षक नीलोत्पल, अपर पोलिस अधीक्षक (अभियान) अनुज तारे, अपर पोलिस अधीक्षक (प्रशासन) कुमार चिंता व अपर पोलिस अधीक्षक (अहेरी) यतिश देशमुख उपस्थित होते. सदर कार्यक्रमासाठी प्रभारी अधिकारी जनसंपर्क व प्रोपागंडा तथा सर्व अंमलदारांनी परिश्रम घेतले.