गडचिरोली : गडचिरोलीत प्रथमच नॅशनल स्कूल आॅफ ड्रामा, नवी दिल्लीच्या सहकार्याने आणि लोकजागृती संस्था चंद्रपूर तथा गोंडवाना विद्यापीठाच्या पुढाकारातून महिनाभराची नाट्य प्रशिक्षण कार्यशाळा घेण्यात आली. या कार्यशाळेचा समारोप येत्या ३ सप्टेंबरला होणार आहे. त्यानिमित्त कार्यशाळेतील प्रशिक्षणार्थी विद्यार्थी वीर बाबुराव शेडमाके यांच्या जीवनकार्यावर आधारित क्रांतीनाट्य सादर करणार आहेत. या नाटकाला सर्वांना मोफत प्रवेश राहणार असून त्याचा गडचिरोलीकरांनी लाभ घ्यावा असे आवाहन नाट्य दिग्दर्शक तथा लोकजागृती संस्थेचे संचालक अनिरूद्ध वनकर यांनी केले आहे.
रविवार, दि.३ रोजी सायंकाळी ६.३० वाजता अभिनव लॅान येथे होणाऱ्या या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विधानसभेतील विरोधीपक्ष नेते विजय वडेट्टीवार, तर विशेष उपस्थितीमध्ये खा.अशोक नेते, आ.डॅा.देवराव होळी, आ.कृष्णा गजबे, जिल्हाधिकारी संजय मीना, कुलगुरू डॅा.प्रशांत बोकारे हे राहणार आहेत.
भारतीय लोककलेचा एक भाग असलेली नाट्यकला लुप्त होऊ नये यासाठी केंद्र सरकारच्या संस्कृती मंत्रालयाअंतर्गत नॅशनल स्कूल आॅफ ड्रामाच्या आर्थिक सहकार्यातून हे नाट्य प्रशिक्षण आयोजित केले आहे. त्यात गडचिरोली आणि चंद्रपूर जिल्ह्यातील ३० विद्यार्थ्यांची निवड केली होती. त्यांना अभिनयासोबत रंगमंचावरील सर्व गोष्टी या प्रशिक्षणात शिकवण्यात आल्याचे अनिरूद्ध वनकर यांनी पत्रपरिषदेत सांगितले. कार्यशाळेच्या संचालिका म्हणून संगिता टिपले जबाबदारी सांभाळत आहेत. पत्रपरिषदेला ड्राम स्कूलचे शिवप्रसाद गौड, प्रा.मुनिश्वर बोरकर उपस्थित होते.
विद्यापीठात सुरू करावा नाट्यशास्र अभ्यासक्रम
राज्यातील बहुतांश सर्व विद्यापीठात नाट्यशास्रावरील अभ्यासक्रम आहेत. मात्र झाडीपट्टी रंगभूमीची देण असणाऱ्या गडचिरोलीतील गोंडवाना विद्यापीठात हा अभ्यासक्रम नसल्याबद्दल वनकर यांनी खंत व्यक्त केली. विद्यापीठाने २ वर्षाचा पदव्युत्तर अभ्यासक्रम सुरू करावा, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली. याशिवाय गडचिरोलीत सुसज्ज नाट्यगृह उभारण्यासाठी लोकप्रतिनिधी आणि प्रशासनाने पुढाकार घेण्याची मागणी त्यांनी केली.