दुग्धजन्य पदार्थांच्या भेसळखोरीवर आता अप्पर जिल्हाधिकाऱ्यांच्या समितीची नजर

तुमच्या भागात होते भेसळ? करा तक्रार

गडचिरोली : राज्याच्या अन्न व औषधी प्रशासन खात्याच्या मंत्रीपदाचा कारभार हाती घेताच धर्मरावबाबा आत्राम यांनी भेसळखोरीवर लगाम घालण्याचे ठरविले. त्याचाच एक भाग म्हणून भेसळ रोखण्यासाठी आणि ग्राहकांना शुद्ध पदार्थ मिळण्यासाठी अपर जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली समिती गठीत करण्यात आली आहे. भेसळखोरीची तपासणी आणि त्यासंदर्भात आलेल्या तक्रारीनुसार अन्न प्रशासन विभागाच्या सहकार्याने कारवाया केल्या जाणार आहेत.

या समितीमध्ये अप्पर जिल्हाधिकारी अध्यक्ष, तर अप्पर पोलिस अधीक्षक, अन्न व औषध प्रशासन विभागाचे सहायक आयुक्त, जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त, उपनियंत्रक वैध मापन शास्त्र हे सदस्य तर जिल्हा दुग्धव्यवसाय विकास अधिकारी हे सदस्य सचिव असतील.

गडचिरोली जिल्ह्यातील दुध भेसळीवर प्रतिबंधात्मक कारवाई करण्यासाठी समितीची पहिली बैठक दि.30 आॅगस्ट 2023 रोजी घेण्यात आली. सदर बैठकीमध्ये अध्यक्षांनी दूध भेसळीच्या वाढत्या प्रकरणांबद्दल चिंता व्यक्त केली. दूध आपल्या दैनंदिन आहाराचा एक आवश्यक भाग असल्याने महत्वपूर्ण पोषक तत्वांचा स्त्रोत आहे. चांगले आरोग्य राखण्यास महत्वपूर्ण भूमिका बजावते. तथापी हाणीकारक पदार्थांसह दुधात भेसळ केल्याने ग्राहकांच्या आरोग्याला मोठा धोका निर्माण होतो.

काही समाजकंटक व्यक्ती नफा वाढविण्यासाठी त्यांची गुणवंत्ता आणि सुरक्षेशी तडजोड करुन विविध फसव्या पद्धतीचा वापर करून दुधात भेसळ करतात. दुग्ध भेसळीच्या सामान्य प्रकारामध्ये पाणी, दुधभुक्टी, वनस्पती तेल, स्टार्च, युरीया, डीटर्जन्ट आणि ईतर रसायनांचा समावेश करतात. हे भेसळ करणारे केवळ दुधाच्या पौष्टिक मुल्यांशी तडजोड करीत नाहीत, तर मानवी शारीरिक समस्या, पचन, एलर्जी आणि दीर्घकालीन अवयवाचे नुकसान करतात.

या समस्यांचा प्रभावीपणे सामना करण्यासाठी ग्राहक, सरकारी संस्था, दुग्ध उद्योगाचे भागधारक आणि नियामक संस्था यांनी एकत्रपणे काम करणे अत्यंत आवश्यक आहे. त्यासाठी समितीमार्फत गडचिरोली जिल्हयातील दुध संकलन स्विकृती केंन्द्र, जिल्ह्यातील, जिल्ह्याबाहेरील तसेच परराज्यातून येणाऱ्या दुधाचे नमुने, तसेच सरकारी व खाजगी क्षेत्रातील दूध संकलन व प्रक्रिया केंद्रावरील (डेयरी) नमुने यांची तपासणी सहाय्यक आयुक्त, अन्न व औषधी प्रशासन विभागाकडील अन्न सुरक्षा अधिकारी यांना दरमहा उद्दीष्ट ठरवून देण्यात आले आहे.

दूध भेसळीबाबत समाजामध्ये जागरूकता निर्माण होवुन दूध भेसळ रोखण्यासाठी कुठे दुधात किंवा पेढा, खोवा, बासुंदी यासारख्या कोणत्याही दूग्धजन्य पदार्थांमध्ये भेसळ असल्याचे जाणवल्यास त्याबाबतची माहिती 07132-295070, 07132-222311 या दुरध्वनी क्रमांकावर किंवा इमेल आयडी fdagadchiroli@gmail.com यावर कळवावी. दुध भेसळीबाबत तक्रार/माहिती देणाऱ्या व्यक्तिचे नाव गोपनिय ठेवण्यात येईल, असे दुध भेसळ प्रतिबंधात्मक समितीचे अध्यक्ष तथा अप्पर जिल्हाधिकारी गडचिरोली यांनी कळविले आहे.