गडचिरोली : निवडणुकीकरिता मतदान केंद्रांवर नेल्या जाणाऱ्या ईव्हीएम मशीन तयार करण्यास आजपासून सुरूवात होणार आहे. त्यासाठी 9, 10, 11 व 12 एप्रिल या तारखा निश्चित करण्यात आल्या आहेत. या प्रक्रियेदरम्यान निवडणूक लढणारे उमेदवार किंवा त्यांच्या प्रतिनिधींनी संबंधित विधानसभा मतदार संघातील मतदार यंत्र सिलिंग करण्याच्या ठिकाणी उपस्थित राहावे, असे आवाहन जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी संजय दैने यांनी केले आहे.
लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 साठी गडचिरोली-चिमुर लोकसभा क्षेत्राअंतर्गत 19 एप्रिल रोजी मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. निवडणूक आयोगाच्या नियमानुसार मतदान प्रक्रिया सुरक्षित व पारदर्शक होण्याकरिता सर्व मतदान यंत्रांचे विधानसभा मतदार संघनिहाय सिलिंग (Candidate setting) करण्याची प्रक्रिया पूर्ण करण्यात येणार आहे.
यात आमगाव विधानसभा मतदारसंघातील 311 मतदान केंद्रांसाठी शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था देवरी येथे 9 व 10 एप्रिल रोजी सकाळी 10 वाजता, आरमोरी विधानसभा मतदारसंघातील 302 मतदान केंद्रांसाठी तहसील कार्यालय, देसाईगंज येथे 12 व 13 एप्रिल रोजी सकाळी 9 वाजता, गडचिरोली विधानसभा मतदारसंघातील 356 मतदान केंद्रांसाठी शासकीय प्रशिक्षण संस्था गडचिरोली येथे 10 ते 12 एप्रिल दरम्यान सकाळी 8 वाजता, अहेरी विधानसभा मतदारसंघातील 292 मतदान केंद्रांसाठी शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, नागेपल्ली येथे 11 व 12 एप्रिल रोजी सकाळी 9 वाजता, ब्रम्हपुरी विधानसभा मतदारसंघातील 316 मतदान केंद्रांसाठी शासकीय तंत्रनिकेतन ब्रम्हपुरी येथे 12 व 13 एप्रिल रोजी सकाळी 6 वाजता आणि चिमुर विधानसभा मतदारसंघातील 314 मतदान केंद्रांसाठी राजीव गांधी सभागृह, तहसील कार्यालय परिसर चिमूर येथे दिनांक 12 व 13 एप्रिल रोजी सकाळी 10 वाजता सुरक्षा कक्ष उघडून मतदार यंत्र सिलिंग करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात येणार आहे. यावेळी निवडणूक लढणारे उमेदवार किंवा त्यांचे निवडणूक प्रतिनिधी यांनी उपस्थित राहावे, अशा सूचना निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी दिल्या आहेत.