१४ वर्षांपासून रखडलेल्या कोसरी सिंचन प्रकल्पग्रस्तांना ना पाणी, ना प्रमाणपत्र

775 हेक्टर शेती पाण्यासाठी आसुसलेली

आरमोरी : जिल्ह्यातल्या आरमोरी तालुक्यातील कोसरी सिंचन प्रकल्पाचे काम गेल्या 14 वर्षांपासून रखडले आहे. हे काम पूर्णत्वास येऊ न शकल्यामुळे या परिसरातील 775 हेक्टर शेती सिंचनापासून वंचित आहे. या प्रकल्पात शेतजमीन गेलेल्या 37 शेतकऱ्यांचे पुनर्वसन करण्यात आले असले तरी त्यांना अद्याप प्रकल्पग्रस्त म्हणून प्रमाणपत्र मिळालेले नाही. त्यामुळे ते विविध सवलतींच्या लाभापासून वंचित आहेत.

आरमोरी तालुक्यातील शेवटच्या टोकावर असलेल्या कोसरी सिंचन प्रकल्पाचे काम 14 वर्षांपूर्वी हाती घेण्यात आले होते. मात्र या सिंचन प्रकल्पाचे भिजत घोंगडे अद्यापही कायम आहे. या प्रकल्पाचे पाणी अद्याप शेतकऱ्यांच्या शेतापर्यंत पोहोचलेले नाही. प्रकल्पामुळे ज्या 37 शेतकऱ्यांचे पुनर्वसन करण्यात आले त्यांना प्रकल्पग्रस्त म्हणून प्रमाणपत्रही देण्यात आले नाही. यातील तांत्रिक अडचण दूर करून न्याय द्यावा, अशी मागणी प्रकल्पग्रस्त शेतकरी करीत आहेत.

कोसरी लघु पाटबंधारे प्रकल्पामध्ये चवेला या गावातील 37 कुटुंबाची शेतजमीन गेली आहे. त्यानंतर शासनाने या 37 कुटुंबियांचे पुनर्वसन करून त्यांना मोबदलाही दिला. परंतु त्यांना प्रकल्पग्रस्त असल्याचे प्रमाणपत्र न मिळाल्यामुळे शासनाच्या अनेक योजनांपासून हे कुटुंबीय वंचित आहेत.

पुचाली उभारणी कधी करणार?

जुन्या चवेला गावातील शेतावर जाण्यासाठी सिंचन प्रकल्प असलेल्या ठिकाणावरूनच पुलाची उभारणी करण्याचे आश्वासन शेतकऱ्यांना देण्यात आले होते. दरम्यान मागील वर्षी पुलाची निर्मिती करण्यासंदर्भात सर्वेक्षणसुद्धा करण्यात आले, मात्र अद्यापही पुलाची निर्मिती करण्यात आली नसल्यामुळे शेतात जाण्यासाठी शेतकऱ्यांना कसरत आणि हाल सहन करावे लागत आहेत.

कोट्यवधी रुपये खर्च करून कोसरी लघु पाटबंधारे सिंचन प्रकल्प उभारण्यात आला असला तरी अद्यापपर्यंत या प्रकल्पाचे पाणी शेतकऱ्यांच्या शेतापर्यंत जात नसल्यामुळे त्यावर खर्च झालेले कोट्यवधी रुपये वाया गेल्याची स्थिती आहे. याबाबत वारंवार प्रशासनाकडे प्रकल्पग्रस्त कुटुंबियांनी पाठपुरावा केला, मात्र प्रशासन या बाबीकडे दुर्लक्ष करत असल्याचा आरोप जीवन सुरसाम, केशरी मडावी, सुकरू पदा, जाऊबाई हिचामी, ओमप्रकाश नैताम , रतिराम सुरसाम, सुखदेव पदा, देवराव मडावी आदी शेतकऱ्यांनी केला आहे.