भलामोठा मतदार संघ पिंजून काढताना कार्यकर्त्यांची दमछाक, नियोजनाचा कस

अनेक गावांत बॅनर पोहोचलेच नाही

गडचिरोली : सिरोंचा ते सालेकसा असा ७०० किलोमीटरमध्ये पसरलेला गडचिरोली-चिमूर लोकसभा मतदार संघ पिंजून काढताना कार्यकर्त्यांची सध्या चांगलीच दमछाक होत असल्याचे दिसून येत आहे. निवडणूक व्यवस्थापनाचे काम पाहणाऱ्यांच्या नियोजनाचा यात कस लागत आहे. विशेष म्हणजे अनेक गावांमध्ये अद्याप उमेदवारांचे बॅनर, होर्डिंगसुद्धा लागलेले नाही.

येत्या १९ एप्रिलला मतदान असल्यामुळे दि.१७ पर्यंतच जाहीर प्रचार करता येणार आहे. त्यामुळे प्रचारासाठी आता केवळ आठ दिवस हातात आहेत. प्रत्येक गावात उमेदवाराला व्यक्तीश: पोहोचणे शक्य नसल्यामुळे त्या भागातील पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्त्यांना योग्य पद्धतीने कामी लावून मतदारांपर्यंत पोहोचविणे गरजेचे असते. अनेक ठिकाणी ही यंत्रणा योग्य पद्धतीने कामही करत नाही. पण त्यांनी सोपविलेले काम योग्य पद्धतीने केले किंवा नाही यावर निगरानी ठेवणारी यंत्रणाही पक्षाकडे असणे गरजेचे असते.

या बाबतीत भाजपची यंत्रणा नेहमीच सतर्क असते. यावेळी काँग्रेसनेही तशी यंत्रणा कामी लावल्याचे दिसून येते. काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांच्या मार्गदर्शनात महाविकास आघाडीची यंत्रणा काम करत आहे.