गावकऱ्यांनी धावून जात विझविली धगधगलेली आग, माणुसकीचा प्रत्यय

पहा व्हिडिओ, गोठा खाक, घर वाचले

देसाईगंज : गडचिरोली जिल्ह्यातल्या देसाईगंज तालुक्यातील कोंढाळा गावात सोमवारी संध्याकाळी ६ वाजताच्या सुमारास श्रावण कोडापे यांच्या गोठ्याला आग लागली. काही क्षणात आगीने रौद्ररूप धारण केले. पण गावकऱ्यांच्या माणुसकीचा प्रत्यय देत धावून येऊन आग विझविली. त्यामुळे जवळच असलेले कोडापे यांचे घर थोडक्यात बचावले.

कोडापे यांच्या घरालगत असलेल्या गोठ्यावर फटाक्यांची ठिणगी उडून आग लागल्याचे बोलले जात आहे. गोठ्यातील चारा आणि तणसामुळे काही वेळातच आगीने भडका घेतला. पण शेजारच्या लोकांनी आपापल्या घरातून बकेट आणून जवळच्या विहिरीमधून पाणी काढत आग विझविली. यावेळी गोठ्यात असलेल्या दोन बैलांच्या अंगावर आगीने लपेटलेले गोठ्याचे छत कोसळले. त्यामुळे आगीची आस लागून बैल जखमी झाले. गोठ्यातील इतर वस्तू आणि चारा पूर्णपणे जळून खाक झाला.