शेतमालाला उत्पादन खर्चाच्या तुलनेत योग्य आधारभूत दर द्यावा- डॉ.किरसान

दंडारच्या उद्घाटनप्रसंगी व्यक्त केली भावना

चामोर्शी : चामोर्शी तालुक्यातील बेघरटोला, येनापूर येथील युवा गणेश मंडळद्वारा आयोजित ‘नजर लागली संसाराला’ या दंडारीचे उद्घाटन महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे महासचिव तथा गडचिरोली-चिमूर लोकसभा समन्वयक डॉ.नामदेव किरसान यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी त्यांनी कृषी उत्पादनाला योग्य दर मिळत नसल्याने शेतकऱ्यांची स्थिती बिघडत असल्याचे सांगितले.

यावर्षी सुद्धा धान खरेदीसाठी शासनाने आधारभूत किंमत प्रतिक्विंटल 2,183 रुपये ठरवलेली आहे. हे दर उत्पादन खर्चाच्या तुलनेत फारच कमी आहे. वाढलेल्या महागाईमुळे शेतकऱ्याच्या उत्पादन खर्चात वाढ झालेली असल्याने सर्व शेतमालाला उत्पादन खर्चाच्या तुलनेत योग्य भाव द्यावा, अशी अपेक्षा त्यांनी आपल्या भाषणात व्यक्त केली.

शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्याचे व शेतमालाला उत्पादन खर्चाच्या दीडपट दर देण्याचे आश्वासन पाळून या हंगामात तरी शासनाने शेतमालाला योग्य दर द्यावा, असे डॅा.किरसान म्हणाले. शासन जर शेतकरीविरोधी धोरण अवलंबित असेल तर अशा लोकांना धडा शिकविण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले.

यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष निकेश गद्देवार, सहउद्घाटक साईनाथ कोवे, यादव मेश्राम, संतोष गेडाम, गोपिका अंधारे, शितल अवतारे, प्रतिभा कोरडे, रेखा गेडाम, प्रमोद उमरे, विश्वास बोनगंटीवार, रुपेश टिकले, गुलाबराव गद्देवार, कडूजी गेडाम, मुकेश पाऊलबुद्धे, संजय बांबोळे, वसंत दांडेकर, बाळू निखाडे, कोमल अक्केवार, पवन आत्राम यांच्यासह मोठ्या संख्येने प्रेक्षक उपस्थित होते.