गडचिरोली : सिरोंचा तालुक्यासह जिल्ह्यात पावसाने उसंत घेतलेली असली तरी धरणांमधील पाण्याच्या विसर्गामुळे नद्यांना अजूनही पूर आहे. तेलंगणाकडून छत्तीसगडमधील जगदलपूरकडे जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्गावर इंद्रावती नदीच्या पुराचे पाणी चढले आहे. त्यामुळे छत्तीसगडकडे जाणारे 353 प्रवासी अडकून पडले. त्यांना सिरोंचा तालुक्यातील असरअल्ली येथील आश्रयगृहात ठेवण्यात आले.
प्रशासनाने दिलेल्या माहिती शनिवारी दुपारपर्यंत अहेरी, भामरागड, एटापल्ली आणि सिरोंचा तालुक्यातील 15 मार्ग वाहतुकीसाठी बंद होते. त्यात सिरोंचा तालुक्यातील सहा मार्ग हे क्षतिग्रस्त झालेल्या पुलांमुळे बंद झाले आहेत हे विशेष. तेलंगणा सरकारच्या मेडीगड्डा धरणाच्या 85 गेटमधून सोडल्या जात असलेल्या पाण्याचा फटका गडचिरोली जिल्ह्याच्या सिरोंचा तालुक्यातील नागरिकांना मोठ्या प्रमाणात बसत आहे.
जिल्हा प्रशासनाने कोणत्याही नैसर्गिक आपत्तीत नागरिकांना तातडीने मदत मिळावी यासाठी एसडीआरएफचे २ पथक सिरोंचा येथे तर एक तुकडी गडचिरोली येथे राखीव ठेवली आहे. याशिवाय सीआरपीएफच्या अहेरी येथील बटालियनमधील 50 जवानांचे पथक सिरोंचा येथे तैनात केले आहे.
गुरूवारी आणि शुक्रवारी 300 पेक्षा जास्त नागरिकांना प्रशासनाने ठिकठिकाणी तयार केलेल्या आश्रयगृहात ठेवले होते. शनिवारी पूर ओसरायला सुरूवात झाल्याने आश्रयगृहात ठेवलेल्या नागरिकांना टप्प्याटप्प्याने त्यांच्या गावी पाठविण्याची कार्यवाही सुरू करण्यात आली आहे.