पंतप्रधान मोदींनी केले अहेरीतील किसान समृद्धी केंद्राचे आभासी लोकार्पण

अम्ब्रिशराव आत्राम यांची प्रमुख उपस्थिती

अहेरी : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरूवारी देशभरातील सव्वा लाख ‘प्रधानमंत्री किसान समृद्धी केंद्रां’चे आभासी पद्धतीने लोकार्पण केले. यात अहेरीतील केंद्राचाही समावेश होता. अहेरीतील विठ्ठल मंदिरात माजी राज्यमंत्री अम्ब्रिशराव आत्राम यांच्या प्रमुख उपस्थितीत झालेल्या या कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण दाखविण्यात आले. या कार्यक्रमाच सर्व केंद्रांमधील शेतकऱ्यांशी पंतप्रधान मोदी यांनी राजस्थानमधील सिकर येथून ऑनलाइन संवाद साधून मार्गदर्शन केले.

यावेळी शेतकऱ्यांना शेतीसाठी लागणारे बी-बियाणे, औषधी, औजारे, खते हे एकाच ठिकाणी मिळावे या उद्देशाने प्रधानमंत्री किसान समृद्धी केंद्र या योजनेचा प्रारंभ आणि पीएम किसान सन्मान निधीच्या 14 व्या हप्त्याचे वितरण करण्यात आले. भारतीय जनता पक्षाच्या वतीने विठ्ठल रुक्मिणी मंदिरात हे लाईव्ह प्रक्षेपण बघण्याची व्यवस्था केली होती. यावेळी मोठ्या संख्येने शेतकरी उपस्थित होते.

या कार्यक्रमाला तालुका कृषी अधिकारी संदेश खरात, तसेच कृषी केंद्र संघटनेचे अध्यक्ष राकेश गुप्ता, भाजपचे तालुका अध्यक्ष रवी नेलकुद्री, तसेच भाजपचे पदाधिकारी आणि अहेरी तालुक्यातील शेतकरी वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते.