गडचिरोलीत प्रथमच होणार राष्ट्रीय बॅाल बॅडमिंटन अजिंक्यपद स्पर्धा

देशभरातील ५० संघ होणार सहभागी

गडचिरोली : जिल्हाच्या इतिहासात प्रथमच येत्या ६ ते १० जानेवारीदरम्यान राष्ट्रीय स्तरावरील वरिष्ठ गट बॅाल बॅडमिंटन अजिंक्यपद स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. शासकीय विज्ञान महाविद्यालयाच्या मैदानावर सदर स्पर्धा होणार आहे.

शासकीय विज्ञान महाविद्यालय गडचिरोली, बॉल-बॅडमिंटन फेडरेशन ऑफ इंडिया, दि महाराष्ट्र बॉल बॅडमिंटन असोशिएशन व बॉल-बॅडमिंटन असोशिएशन गडचिरोली यांच्या संयुक्त विद्यमाने सदर स्पर्धा होत आहे. महिला आणि पुरूष अशा दोन्ही गटात ही स्पर्धा होणार आहे.

स्पर्धेचे उद्घाटन ७ जानेवारी रोजी सकाळी ११ वाजता राज्याचे अन्न व औषध प्रशासनमंत्री धर्मरावबाबा आत्राम यांच्या हस्ते होणार आहे. या कार्यक्रमाला विशेष अतिथी म्हणून क्रीडामंत्री संजय बनसोडे उपस्थित राहणार आहेत. प्रमुख अतिथी म्हणून आ.डॉ.देवराव होळी, आ.कृष्णा गजबे उपस्थित राहणार आहेत. याशिवाय माजी जि.प.अध्यक्ष भाग्यश्री आत्राम, उच्चशिक्षण विभागाचे विभागीय सहसंचालक डॉ.संतोष चव्हाण, बॉल-बॅडमिंटन फेडरेशन ऑफ इंडीयाचे महासचिव वाय.राजाराव, दि महाराष्ट्र बॉल-बॅडमिंटन असोशिएशनचे अध्यक्ष डॉ.पी.के.पटेल, शिवछत्रपती पुरस्कारप्राप्त प्राचार्य डॉ.हनुमंत लुगे, नवनियुक्त जिल्हा नियोजन समिती सदस्य लिलाधर भरडकर आदी प्रामुख्याने उपस्थित राहणार आहेत. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ. प्रशांत जाखी राहणार आहेत.

या स्पर्धेचा जिल्ह्यातील नागरीकांनी आनंद घ्यावा, असे आवाहन दि महाराष्ट्र बॉल-बॅडमिंटन असोशिएशनचे महासचिव अतुल इंगळे, बॉल-बॉडमिंटन फेडरेशनच्या कार्यकारी समिती सदस्य प्रा.रुपाली पापडकर, शासकीय महाविद्यालयाचे क्रीडा संचालक डॉ.सुरज येवतीकर, बॉल-बॅडमिंटन असोशिएशन गडचिरोलीचे अध्यक्ष ओमप्रकाश संग्रामे, सचिव ऋषिकांत पापडकर यांनी केले आहे.