गडचिरोली : जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीचा मुहूर्त अखेर सापडला आहे. येत्या 6 जानेवारीला दुपारी 1 वाजता ही बैठक होणार आहे. यापूर्वी 18 जानेवारी 2023 रोजी जिल्हा नियोजन समितीची बैठक झाली होती. त्यानंतर आता जवळपास वर्षभरानंतर ही बैठक होणार आहे. गडचिरोली जिल्ह्याच्या इतिहासात इतक्या लांब कालावधीनंतर बैठक होण्याची ही पहिलीच वेळ आहे.
या बैठकीला पालकमंत्री तथा राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अन्न व औषध प्रशासनमंत्री धर्मरावबाबा आत्राम प्रामुख्याने उपस्थित राहतील. नियोजन समितीच्या बैठकीअभावी अनेक कामांचे प्रस्ताव प्रलंबित आहेत. आर्थिक वर्ष संपण्यासाठी जेमतेम 3 महिने शिल्लक असताना या बैठकीत प्रलंबित कामांना मंजुरी मिळवणे आणि 31 मार्चपूर्वी त्या कामांवरील निधीचे वाटप तथा खर्च करताना प्रशासकीय यंत्रणेला मोठी धावपळ करावी लागणार आहे.
असा आहे ना.धर्मरावबाबा आत्राम यांचा दौरा
ना.धर्मरावबाबा आत्राम यांचे ६ जानेवारीला सकाळी 10.30 वाजता गडचिरोलीत आगमन झाल्यानंतर शासकीय विश्रामगृहावर त्यांचा वेळ राखिव राहील. त्यानंतर दुपारी 1 ते 3 वाजेपर्यंत ते जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीला उपस्थित राहतील. दुपारी 3 ते 6 पर्यंत शासकीय विश्रामगृहावर त्यांचा वेळ राखीव असून त्यानंतर सायंकाळी 6 वाजता जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या सभागृहात पत्रकार दिनानिमित्त आयोजित गडचिरोली जिल्हा गौरव कार्यक्रमास ते उपस्थित राहून गडचिरोलीत मुक्काम करतील. रविवार दि.7 रोजी शासकीय विज्ञान महाविद्यालयात सकाळी 11 वाजता आयोजित 69 व्या वरिष्ठ गट राष्ट्रीय बॉल बॅडमिंटन अजिंक्यपद स्पर्धेच्या उद्घाटन कार्यक्रमास उपस्थित राहतील. दुपारी 2 वाजता सुयोग निवासस्थान, गडचिरोली येथून नागपूरकडे रहावा होतील.