गडचिरोली : जिल्हा पोलिस दलाच्या नक्षलविरोधी अभियान पथकातील सात सी-६० कमांडो बाईकवरून दक्षिण भारताच्या टूरवर निघाले आहेत. नक्षलवाद्यांविरूद्ध लढताना शहीद झालेल्या पोलिस अधिकारी आणि जवानांची यशोगाथा सांगण्यासाठी हे कमांडो साडेसहा हजार किलोमीटरचा प्रवास करणार आहेत. पोलिस अधीक्षक नीलोत्पल यांनी हिरवा झेंडा दाखवून त्यांना रवाना केले. यावेळी अपर पोलिस अधीक्षक (अभियान) अनुज तारे, अपर पोलिस अधीक्षक (प्रशासन) कुमार चिंता हे प्रामुख्याने उपस्थित होते.
अवघ्या २२ दिवसात ६ हजार किलोमीटरपेक्षा अधिक प्रवास हे जवान बाईकवरून करणार आहेत. किशोर खोब्रागडे यांच्या नेतृत्वातील या सात जवानांमध्ये देवा अडोळे, विनय सिद्धगू, राहुल जाधव, विनोद गोंगले, निखिल दुर्गे, अजिंक्य तुरे, तसेच भारतीय संरक्षण दलातील निवृत्त पॅरा कमांडो सचिन रामटेके यांचाही यात समावेश आहे. तेलंगणा, हैदराबाद, चेन्नई, कन्याकुमारी, गोवा (पणजी), मार्गे हे पथक पुन्हा महाराष्ट्रात येणार आहे.
नक्षलविरोधी अभियान राबविताना बलिदान दिलेल्या पोलिस अधिकारी, कर्मचाऱ्यांचे योगदान देशातील इतर भागातील नागरिकांना समजावे यासाठी टप्पानिहाय दरवर्षी ही बाईक राईड काढली जात आहे. विशेष म्हणजे याचा खर्च संबंधित पोलिस कर्मचारी स्वत: करतात.