जिल्हाभरात ४५०० विद्यार्थ्यांनी सोडविला पोलिस भरतीचा सराव पेपर

वाचन प्रेरणा दिनानिमित्त पोलिसांचा उपक्रम

गडचिरोली : पोलिस दलाच्या वतीने विद्यार्थ्यांना वाचनाची आणि स्पर्धा परीक्षेची ओढ निर्माण व्हावी आणि स्पर्धा परीक्षेकडे त्यांचा कल वाढावा यासाठी ४५०० विद्यार्थ्यांकडून पोलिस भरतीचा सराव पेपर सोडवून घेण्यात आला. माजी राष्ट्रपती डॅा.ए.पी.जे.अब्दुल कलाम यांच्या जयंतीनिमित्त रविवारी (दि.१५) हा उपक्रम गडचिरोलीसह जिल्हाभरातील पोलिस स्टेशन, उपपोलिस स्टेशनमध्ये राबविण्यात आला.

या उपक्रमात सुरूवातीला ‘एक तास वाचनाकरिता’ या शिर्षकाखाली विद्यार्थ्यांचे सामूहिक वाचन घेण्यात आले. एवढेच नाही तर ‘आय अॅम कलाम’ हा चित्रपटही दाखविण्यात आला. पोलिस मुख्यालयासह जिल्हाभरात पोलिसांनी सुरू केलेल्या ५३ वाचनालयांमध्ये हा उपक्रम राबविण्यात आला.

पोलीस दादालोरा खिडकीच्या माध्यमातून स्पर्धा परिक्षेची तयारी करणा­ऱ्या विद्यार्थ्यांसाठी सकाळी 10 ते 11 या कालावधीत “एक तास वाचनाकरिता” या शिर्षकाखाली सामूहिक वाचन घेण्यात आले. तसेच गडचिरोली जिल्ह्रातील दुर्गम-अतिदुर्गम भागात राहणा­ऱ्या विद्यार्थ्यांना स्पर्धा परिक्षेबद्दल असलेल्या अज्ञानामुळे, त्यांना मिळत नसलेल्या मार्गदर्शनामुळे हे विद्यार्थी स्पर्धा परिक्षेत मागे पडत आहेत. त्यांची उज्वल भविष्याकडे वाटचाल व्हावी व त्यांचा स्पर्धा परिक्षेकडे कल वाढावा यासाठी गडचिरोली पोलीस दलाने व यशोरथ स्पर्धा परीक्षा टेस्ट सिरीज, मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने “प्रोजेक्ट उडान” अंतर्गत गडचिरोलीसह दुर्गम भागातील भामरागड, अहेरी, एटापल्ली, हेडरी व सिरोंचा या ठिकाणी हा उपक्रम राबविण्यात आला.

अनेक ठिकाणी वाचनालय तसेच ग्रामपंचायत कार्यालयाच्या ठिकाणी परीक्षा घेण्यात आल्या. या सराव पेपरदरम्यान अपर पोलीस अधीक्षक कुमार चिंता यांनी शहिद पांडू आलाम सभागृहामध्ये घेतलेल्या सराव पेपरला उपस्थित 850 विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. भविष्यात येणा­या वनरक्षक, आरोग्य सेवक, कृषी सेवक इ.परिक्षांच्या पेपरचा कशा पद्धतीने सराव करावा याबद्दल माहिती दिली.

या कार्यक्रमात पोलीस अधीक्षक नीलोत्पल यांच्या मार्गदर्शनाखाली अपर पोलीस अधीक्षक (प्रशासन) कुमार चिंता, प्रभारी पोलीस उपअधीक्षक (गृह) विश्वास जाधव हे उपस्थित होते.