गडचिरोलीतील कामगिरीसाठी दोन पोलिस अधिकाऱ्यांसह १६ अंमलदारांना राष्ट्रपती पदक

गुणवत्तापूर्ण सेवेसाठी एका अंमलदाराचा सन्मान

गडचिरोली : जिल्ह्यात नक्षलविरोधी अभियानात विशेष कामगिरी केल्याबद्दल दोन पोलिस अधिकारी आणि 16 अंमलदारांना राष्ट्रपतींचे पोलिस शौर्यपदक, तर एका अंमलदाराला गुणवत्तापूर्ण सेवेसाठी पदक जाहीर झाले आहे. प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला संपूर्ण देशभरात 275 जणांना पोलिस शौर्यपदक, तर गुणवत्तापूर्ण सेवेसाठी 753 जणांना पदक जाहीर झाले आहे. त्यातील 19 पदकं एकट्या गडचिरोली पोलिस दलाला जाहीर झाली आहेत. त्यात गडचिरोलीचे तत्कालीन अपर पोलिस अधीक्षक आणि सध्या लातूर येथे पोलिस अधीक्षक असलेले सोमय मुंढे आणि सध्या कोल्हापूर जिल्ह्यातील करवीर येथे उपविभागीय पोलिस अधिकारी असलेल्या संकेत सतीश गोसावी या दोन अधिकाऱ्यांचा समावेश आहे.

विशेष म्हणजे गेल्यावर्षी, म्हणजे 2023 मध्ये गडचिरोली जिल्ह्यातील नक्षलविरोधी कामगिरीसाठी 62 पोलिस अधिकारी आणि अंमलदारांना पदक मिळाले होते. यावर्षी 19 जणांनी हा सन्मान प्राप्त केला आहे. ही गडचिरोली पोलिस दलासाठी अभिमानास्पद कामगिरी ठरली आहे.

पोलिस शौर्यपदक प्राप्त अधिकारी आणि अंमलदारांमध्ये सोमय विनायक मुंढे (भापोसे), पोलिस अधीक्षक लातुर, संकेत सतीश गोसावी, उपविभागीय पोलीस अधिकारी, करवीर जि. कोल्हापूर, पोलिस हवालदार सर्वश्री मोहन लच्छु उसेंडी, देवेंद्र पुरूषोत्तम आत्राम, जीवन बुधाजी नरोटे, माधव कोरके मडावी, संजय वत्ते वाचामी, मुंशी मासा मडावी, गुरुदेव महारुराम धुर्वे, नायक अंमलदार कमलेश निखेल नैताम, शंकर पोचम बाचलवार, विनोद मोतीराम मडावी, दुर्गेश देविदास मेश्राम, तसेच अंमलदार विजय बाबुराव वडेट्टीवार, कैलाश श्रवण गेडाम, हिराजी पितांबर नेवारे, ज्योतीराम बापू वेलादी, सुरज देवीदास चुधरी यांचा समावेश आहे. याशिवाय सहायक फौजदार देवाजी कोट्टू कोवासे यांना गुणवत्तापूर्ण सेवेसाठी पदक जाहीर झाले आहे.

या कामगिरीसाठी पोलिस अधीक्षक नीलोत्पल, प्रभारी पोलिस अधीक्षक कुमार चिंता, अपर पोलिस अधीक्षक (अभियान) यतिश देशमुख, अपर पोलिस अधीक्षक अहेरी (प्राणहिता) एम.रमेश यांनी अभिनंदन करत पुढील सेवेकरीता शुभेच्छा दिल्या आहेत.