वैनगंगा नदीतील नाव दुर्घटनेत आणखी दोन महिलांचे मृतदेह सापडले

नातेवाईकांना प्रत्येकी ४ लाखांची मदत

गडचिरोली : वैनगंगा नदीत नाव (डोंगा) उलटून झालेल्या अपघातात बेपत्ता असलेल्या महिलांपैकी आणखी दोघींचा मृतदेह गुरूवारी सापडला. त्यामुळे या दुर्घटनेतील मृत महिलांची संख्या पाचवर पोहोचली आहे. आणखी एका महिलेचा शोध अद्याप लागलेला नाही. दरम्यान बुधवारपर्यंत मृतदेह सापडलेल्या तीनही महिलांच्या कुटुंबियांना प्रतिकुटुंब ४ लाखांची मदत जिल्हा प्रशासनाकडून देण्यात आली. गुरूवारी मृतदेह सापडलेल्या दोन महिलांच्या कुटुंबियांनाही मदत देण्यासाठी तहसील कार्यालयाकडून प्रक्रिया सुरू आहे.

बुधाबाई देवाजी राऊत आणि सुषमा सचिन राऊत या दोघींचे मृतदेह गुरूवारी दुपारी घटनास्थळापासून १० ते १२ किलोमीटर अंतरावर असलेल्या जयरामपूर घाटाजवळ सापडले. एसडीआरएफच्या चमुकडून बुधवारपासून त्यांचा शोध घेतला जात होता.

जिल्हाधिारी संजय मीना यांच्या मार्गदर्शनात आपत्ती व्यवस्थापन विभागाचे विभागीय समन्वय अधिकारी कृष्णा रेड्डी, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी नील तेलटेंबडे या सर्व मोहीमेची जबाबदारी सांभाळत आहेत.