राज्यातल्या २२ विद्यापीठांचे एक हजार विद्यार्थी जमणार गोंडवाना विद्यापीठात

सोमवारपासून राज्य आपत्ती व्यवस्थापन शिबिर

गडचिरोली : गोंडवाना विद्यापीठाच्या रासेयो विभागाच्या वतीने येत्या २५ डिसेंबर ते ३ जानेवारीदरम्यान राज्यस्तरीय आपत्ती व्यवस्थापन शिबिर ‘आव्हान-२०२३’चे आयोजन करण्यात आले आहे. गडचिरोलीत प्रथमच होत असलेल्या या आपत्ती व्यवस्थापन शिबिरात राज्यभरातल्या २२ विद्यापीठांमधील ५८० विद्यार्थी आणि ४२० विद्यार्थीनी स्वयंसेवक असे एकूण १००० विद्यार्थी, आणि ३७ पुरूष कार्यक्रम अधिकारी आणि ३७ महिला कार्यक्रम अधिकारी सहभागी होणार आहेत.

विद्यापीठाचे प्र-कुलगुरू डॅा.श्रीराम कावळे, कुलसचिव डॅा.अनिल हिरेखण, डॅा.अनिल चिताडे, रासेयोचे डॉ.शाम खंडारे यांनी पत्रकार परिषदेत यासंबंधीची माहिती दिली.

शिबिराचे उद्घाटन दिनांक २५ डिसेंबरला दुपारी १२ वाजता सुमानंद सभागृह येथे वने, सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते आणि खासदार अशोक नेते, आ.डॉ.देवराव होळी, आ.कृष्णा गजबे, कुलगुरू डॉ.प्रशांत बोकारे, जिल्हाधिकारी संजय मीना, प्र-कुलगुरू डॉ.श्रीराम कावळे, एनडीआरएफ कमांडर एस.बी. सिंग यांच्या उपस्थितीत होणार आहे.

समारोपीय कार्यक्रम ३ जानेवारी २०२४ रोजी, सकाळी ११ वाजता होणार आहे. त्यावेळी अतिथी म्हणून विरोधी पक्ष नेते विजय वडेट्टीवार, उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्यासह इतर लोकप्रतिनिधी राहणार आहेत.