पोर्लाच्या जंगलातील युवतीच्या हत्येचा अवघ्या २४ तासात केला पर्दाफाश

प्रेमसंबंधातून हत्या केल्याची प्रियकराची कबुली

गडचिरोली : पोर्ला ते वडधा मार्गावरील जंगलात अर्धनग्न अवस्थेत आढळलेल्या युवतीच्या मृत्यूचे उलगडण्यात पोलिसांना यश आले आहे. ती युवती चंद्रपूर येथील रहिवासी असून वैरागड येथील तिच्या प्रियकरानेच तिची हत्या केल्याचे स्पष्ट झाले. स्थानिक गुन्हे शाखेच्या मदतीने त्या युवकाला पोलिसांनी अटक केली.

याप्रकरणी गडचिरोली पोलिस ठाण्यात अज्ञात आरोपीविरूद्ध भादंवि कलम ३०२ अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला होता. घटनास्थळ हे पोर्ला गावापासून दिड किलोमीटर अंतरावर असल्याने परिसरात एकच खळबळ उडाली होती. मृत युवतीची ओळख पटवून तिच्या खुन्याचा शोध घेण्याचे मोठे आव्हान गडचिरोली पोलिस दलासमोर होते. अपर पोलिस अधीक्षक कुमार चिंता यांनी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकासह घटनास्थळाला प्रत्यक्ष भेट देवून पाहणी केली. श्वान पथक तसेच फिंगर प्रिंट विभागातील अधिकाऱ्यांनाही घटनास्थळावर पाचारण करण्यात आले.

परंतु मृतदेहाची ओळख पटत नसल्याने पोलिस अधीक्षक नीलोत्पफल यांनी सदर गुन्ह्याच्या तपासाकरीता चार तपास पथके तयार करून स्थानिक गुन्हे शाखा गडचिरोली यांना मृतदेहाची ओळख पटवून गुन्हा उघडकिस आणण्याची जबाबदारी सोपविली. दरम्यान गडचिरोली शहरातील एका गोपनिय बातमीदाराने चंद्रपूर येथून एक १९ वर्षीय युवती बेपत्ता असल्याची माहिती दिली. त्यावरून स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने मुलीच्या नातेवाईकांना विश्वासात घेवून मृतदेहाचे फोटो दाखविले असता मृत मुलगी त्यांचीच असल्याची खात्री नातेवाईकांनी दिली.

या युवतीचे वैरागड येथील निखिल मोहुले याच्याशी प्रेमसंबंध असून तिला भेटण्याकरीता निखिल मूल येथे गेला असल्याची खात्रीशीर माहिती मिळाली. त्यानंतर पथकाने वैरागड येथून निखिल यांस ताब्यात घेवून विचारपूस केली असता त्याने सुरूवातीला उडवाउडवीची उत्तरे दिली, पण नंतर या खुनाची कबुली दिली.

ही कारवाई स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक उल्हास भुसारी, सपोनि राहुल आव्हाड, पोउपनि निलेशकुमार चाप, त्रिकांत वोर्डना, प्रशांत गरफडे, क्रिष्णा परचाके, दीपक लोणारे, माणिक निसार, माणिक दुधवडे, सतीश कत्तीवार, मनोहर तोगरवार आणि गडचिरोली ठाण्याच्या पथकाने केली.