गोंडवाना विद्यापीठाने पूर्ण केले एक तप, विविध पुरस्कारांचे होणार वितरण

दोन मंत्र्यांच्या उपस्थितीत सोमवारी कार्यक्रम

गडचिरोली : २०११ मध्ये स्थापन झालेल्या गोंडवाना विद्यापीठाने १२ वर्ष, अर्थात एक तप पूर्ण केले आहे. त्यानिमित्त आयोजित स्थापना दिनाचा कार्यक्रम २ आॅक्टोबरला धामोरा मार्गावरील महाराजा हॅालमध्ये होणार आहे. उच्च व तंत्रशिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील आणि अन्न व औषध प्रशासनमंत्री धर्मरावबाबा आत्राम यांच्या प्रमुख उपस्थितीत होणाऱ्या या कार्यक्रमात विद्यापीठाकडून दिल्या जाणाऱ्या विविध पुरस्कारांचे वितरण होणार आहे. त्यात महत्वाचा जीवनसाधना गौरव पुरस्कार ‘आम्ही आमच्या आरोग्यासाठी’ या संस्थेचे संस्थापक डॉ.सतीश गोगुलवार यांना दिला जाणार आहे.

या कार्यक्रमाच्या निमित्ताने परीक्षा भवन व मॉडेल कॉलेज भवनाचे लोकार्पण, तसेच विद्यापीठ परिसरात वृक्षारोपण करण्यात येणार आहे. सोमवारी दुपारी १२ वाजता होणाऱ्या या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कुलगुरू डॉ.प्रशान्त बोकारे राहणार असून जिल्हाधिकारी संजय मीना, प्र-कुलगुरु डॉ.श्रीराम कावळे, कुलसचिव डॉ.अनिल हिरेखण प्रामुख्याने उपस्थित राहणार आहेत.

यावेळी गोंडवाना विद्यापीठाशी संलग्नित महाविद्यालयांनी “मेरी माटी मेरा देश” या उपक्रमाअंतर्गत जमा केलेल्या मातीचा अमृत कलश गोंडवाना विद्यापीठाच्या रासेयो विभागाचे संचालक डॉ.श्याम खंडारे यांच्या हस्ते उच्च व तंत्रशिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांना सुपूर्द करण्यात येणार असल्याचे कुलगुरू डॅा.बोकारे यांनी पत्रपरिषदेत सांगितले.

असे आहेत पुरस्कार व त्याचे मानकरी

उत्कृष्ट अधिसभा सदस्य पुरस्कार- संजय बलवंतराव रामगीरवार, उत्कृष्ट महाविद्यालय पुरस्कार– निलकंठराव शिंदे विज्ञान व कला महाविद्यालय भद्रावती, उत्कृष्ट प्राचार्य पुरस्कार- डॉ.प्रमोद काटकर, सरदार पटेल महाविद्यालय, चंद्रपूर, उत्कृष्ट शिक्षक पुरस्कार (महाविद्यालय)- आदर्श कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, देसाईगंज (वडसा), सहयोगी प्राध्यापक- डॉ.हितेंद्र धोटे, उत्कृष्ट कर्मचारी पुरस्कार (विद्यापीठ)- भीमराव ज्योतिराव उराडे, उत्कृष्ट कर्मचारी पुरस्कार (महाविद्यालय)- प्रशांत बाजीराव रंदई, प्रयोगशाळा सहाय्यक, जनता महाविद्यालय चंद्रपूर, उत्कृष्ट कर्मचारी पुरस्कार (वर्ग ४) (महाविद्यालय)- योगिता प्रकाश रायपुरे, प्रयोगशाळा परिचर जनता महाविद्यालय चंद्रपूर, उत्कृष्ट विद्यार्थी पुरस्कार- अभिजित किसन अष्टकार, आनंद निकेतन महाविद्यालय वरोरा, उत्कृष्ट विद्यार्थीनी पुरस्कार- डिंपल रमेश बोरकर, गोविंदराव मुनघाटे कला व विज्ञान महाविद्यालय कुरखेडा.

याशिवाय राष्ट्रीय सेवा योजना स्वयंसेविका जान्हवी पेद्दीवार, कार्यक्रम अधिकारी व विभागीय समन्वयक डॉ.पवन नाईक यांचा, तसेच विद्यापीठाचे संचालक डॉ.श्याम खंडारे, प्राचार्य डॉ.हिराजी बनपूरकर यांचा सत्कार तसेच वार्षिकांक स्पर्धेमध्ये प्राविण्यप्राप्त महाविद्यालयांना बक्षीस वितरण करण्यात येणार आहे.