गडचिरोली : गोंडवाना विद्यापीठाच्या सर्व पदवी अभ्यासक्रमाच्या प्रथम सत्रात भारतीय संविधान हा विषय सुरू करण्यास विद्यापीठाच्या राज्यशास्त्र अभ्यासमंडळ व मानवविज्ञान विद्याशाखेने मंजुरी प्रदान केली आहे. पुढच्या सत्रापासून याची अंमलबजावणी करण्याचा विद्यापीठाचा मानस आहे. कुलसचिव डॅा.अनिल हिरेखण यांनी त्यासाठी पुढाकार घेतला.
याशिवाय विद्यापीठात संविधान सन्मान महोत्सव साजरा करण्याचा ठरावही अधिसभेत सर्वानुमते पारित करण्यात आला. विद्यापीठाच्या डॉ.बाबासाहेब आंबेडकर अध्यासन केंद्रामार्फत या महोत्सवाचे आयोजन केले जाणार आहे. विद्यापीठाच्या नवीन कॅम्पसमध्ये (अडपल्ली) भारतीय संविधानाच्या उद्देशिकेचा शिलालेख दर्शनी भागावर उभारण्यात येणार असल्याचेही विद्यापीठाकडून कळविण्यात आले.
गोंडवाना विद्यापिठाची अधिसभा कुलगुरु डॉ.प्रशांत बोकारे यांच्या अध्यक्षतेखाली नुकतीच पार पडली. या अधिसभेत डॉ.मिलींद भगत यांनी संविधान सन्मान महोत्सव साजरा करण्याबाबतचा प्रस्ताव सादर केला होता. सदर प्रस्तावाला दीपक धोपटे यांनी अनुमोदन दिले आणि सर्वानुमते हा ठराव पारित करण्यात आला. संविधान महोत्सवासाठी ५ लाखांचा निधी उपलब्ध करून देण्यात येणार आहे.