गडचिरोली : गेल्या अनेक दिवसात नक्षलवाद्यांच्या हिंसक कृत्यांना आळा घालण्यात यशस्वी झालेल्या गडचिरोली पोलिसांना आता पुन्हा नक्षली हादरे बसत आहेत. शुक्रवारच्या संध्याकाळी अहेरी तालुक्यातील दुर्गम कापेवंचा या गावातील एका युवकाची गोळ्या घालून हत्या केल्याचे उघडकीस आले. पोलिस खबरी असल्याच्या संशयातून त्याची हत्या केल्याचे मृतदेहाजवळ सापडलेल्या नक्षल्यांच्या चिठ्ठीवरून स्पष्ट झाले. गेल्या १० दिवसात नक्षलवाद्यांनी केलेली ही तिसरी हत्या आहे.
यापूर्वी मुख्यमंत्र्यांच्या गडचिरोली दौऱ्यानंतर दुसऱ्या दिवशी १५ नोव्हेंबरला भामरागड तालुक्यात पेनगुंडा येथे दिनेश गावडे याची, २३ नोव्हेंबरच्या रात्री एटापल्ली तालुक्यात टिटोडा येथील लालसू वेळदा या पोलिस पाटलाची, आणि दि.२४ च्या रात्री अहेरी तालुक्यातील कोपेवंचा येथील रामजी आत्राम या युवकाची गोळ्या घालून हत्या करण्यात आल्याने दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
अवघ्या १० दिवसात नक्षलवाद्यांनी तीन लोकांची हत्या करून आपले अस्तित्व सिद्ध केले आहे. त्यामुळे एकीकडे नक्षली कारवाया कमी झाल्याचे वाटत असताना ही चळवळ पुन्हा डोके वर काढते की काय, अशी शंका निर्माण होत आहे.