जिल्ह्यातील क्रिकेटपटूंसाठी लॅायड्स मेटल्सकडून ‘जीपीएल’चे आयोजन

प्रथम बक्षीस 11 लाख, द्वितीय 7 लाख

गडचरोली : जिल्ह्यातील क्रिकेटपटूंना पुढे येण्याची संधी मिळावी आणि त्यांच्यातील प्रतिभेला प्रोत्साहन मिळावे यासाठी लॅायड्स मेटल्स अँड एनर्जी लि.यांच्याकडून गडचिरोलीत ‘जीपीएल’ क्रिकेट स्पर्धेचे (गडचिरोली प्रिमियर लिग) आयोजन करण्यात आले आहे. येत्या 5 फेब्रुवारीला या स्पर्धेचे उद्घाटन भारतीय क्रिकेट संघाचे माजी कर्णधार आणि माजी प्रशिक्षक रवी शास्री यांच्या हस्ते होणार आहे. विशेष म्हणजे या स्पर्धेसाठी लाखो रुपयांची बक्षिसे आहेत. मात्र या स्पर्धेत केवळ गडचिरोली जिल्ह्यातील तालुकानिहाय संघच सहभागी होऊ शकणार आहेत.

लॅायड्स मेटल्सचे संचालक तथा गुजरातचे माजी पोलीस महासंचालक एस.एस. खांडवावाला, संचालक ले.कर्नल (निवृत्त) विक्रम मेहता यांनी या स्पर्धेच्या तयारीची माध्यमांना माहिती दिली.

या स्पर्धेत प्रत्येक तालुक्याचा एक संघ याप्रमाणे 12 संघ, तसेच महसूल, वन, पोलीस आणि लॅायड्सचे कर्मचारी असे 16 संघ सहभागी होतील. त्यांची चार विभागांमध्ये विभागणी केली जाणार आहे. 20 ओव्हरचा एक सामना याप्रमाणे एकूण 32 सामने खेळविले जातील. आयपीएल स्टँडर्डनुसार होणाऱ्या या सामन्यांची तयारी 3 महिन्यांपासून सुरू झाली असून सहभागी खेळाडूंच्या साहित्यासह त्यांचा सर्व खर्च लॅायड्सकडून केला जाणार आहे. तालुकानिहाय संघांच्या निवडीसाठी क्रीडा विभागासह पोलीस विभागाची मदत घेतली जाणार आहे.

उत्कृष्ट खेळाडूंना पाठविणार प्रशिक्षणाला

गडचिरोली जिल्ह्यातील क्रिकेट खेळाडूंनी राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर चमकण्यासाठी या सामन्यांमधील उत्कृष्ट खेळाडूंना कंपनीकडून 10 दिवसांच्या प्रशिक्षणासाठी पाठविले जाईल. त्यात या खेळाडूंनी योग्य चमक दाखविल्यास त्यांना रणजी सामन्यांसह इतर सामन्यांसाठी निवडले जाईल.

लाखो रुपयांच्या बक्षिसांची लयलूट

या सामन्यांमध्ये अंतिम विजेत्या संघाला 11 लाख 11 हजार 111 रुपये, उपविजेत्या संघाला 7 लाख, तृतीय 5 लाख आणि चतुर्थ बक्षीस 2 लाख रुपये राहणार आहे. याशिवाय उत्कृष्ट बॅालर, उत्कृ्ष्ट बॅट्समन, उत्कृ्ष्ट फिल्डर, मॅन अॅाफ द मॅच अशांसाठी क्वॅार्टर फायनल, सेमी फायनल, फायनल अशा वेगवेगळ्या स्तरावर 25 हजारापासून तर 1 लाखापर्यंत वैयक्तिक बक्षीसेही ठेवण्यात आली आहेत.

दिवसरात्र चालणार सामने

गडचिरोलीतील जिल्हा स्टेडिअमवर होणारे हे सामने दिवसरात्र खेळविले जाणार आहेत. स्पर्धेच्या नियोजनासाठी वेगवेगळ्या समित्या गठित करण्यात आल्याचे यावेळी सांगण्यात आले. पत्रकार परिषदेला लॅायड्सचे पदाधिकारी बलराम सोमनानी, वेदांश जोशी, डॅा.चरणजितसिंह सलुजा, रोमित तोम्बर्लावार, गडचिरोली क्रिकेट असोसिएशनचे मंगेश देशमुख, लॅायड्स स्पोर्टस् अॅकेडमीचे संचालक राजा आदी प्रामुख्याने उपस्थित होते.