नाशिक जिल्ह्याच्या युवकाने केले अहेरीतील मुलीचे लैंगिक शोषण

ऑनलाईन गेमच्या माध्यमातून मैत्री

अहेरी : अल्पवयीन मैत्रिणीचे आई-वडील कामानिमित्त बाहेरगावी गेल्याची संधी साधून नाशिकच्या एका युवकाने अहेरीत येऊन मुलीच्या घरी मुक्काम करत तिचे लैंगिक शोषण केले. सकाळी नागरिकांनी त्या आरोपीला पकडून पोलिसांच्या स्वाधीन केले. मोहम्मद सौद राजू शमसुद्दीन अन्सारी (22 वर्ष) रा.मालेगाव, जि.नाशिक असे आरोपीचे नाव आहे.

पीडित मुलगी अवघी 14 वर्षांची आहे. ‘फ्री फायर’ या ऑनलाईन गेमच्या माध्यमातून आरोपी आणि सदर मुलीची ओळख झाली होती. यातून दोघांत रोज चॅटिंग आणि फोनवरून बोलणे व्हायचे. त्यांच्या मैत्रीचे रूपांतर प्रेमात झाले. यात मुलीचे आई-वडील बाहेरगावी गेल्याचे कळताच त्या आरोपी युवकाने 11 जानेवारीला अहेरी गाठले.

सकाळी मुलीच्या घरी असलेल्या त्या अनोळखी तरुणाची कुणकुण शेजारच्या लोकांना लागल्यानंतर चर्चा सुरू झाली. त्याला लोकांनी पकडून पोलिसांच्या स्वाधीन केले. त्याच्याविरूद्ध बाललैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली. न्यायालयाने त्याला दोन दिवसांचा पीसीआर दिला आहे.