खिळखिळ्या बसगाड्या चालवू नका, ग्राहक पंचायतची डीसींकडे मागणी

विभागीय नियंत्रकांना दिले निवेदन

गडचिरोली : गडचिरोलीसह सर्व तालुक्यातील प्रवासी ग्राहक आणि शालेय मुला-मुलींच्या खिळखिळ्या झालेल्या जुन्या एसटी बसगाड्यांमुळे प्रवाशांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर येत आहे. त्यामुळे जुन्या भंगारावस्थेतील बसगाड्या बंद करा, अशी मागणी अ.भा.ग्राहक पंचायतच्या वतीने एका निवेदनातून विभागीय नियंत्रकांकडे करण्यात आली.

जिल्ह्यातील हजारो प्रवासी तसेच शालेय विद्यार्थ्यांना भंगार बसगाड्यांमुळे समस्यांचा सामना करावा लागत आहे. याचा नाहक त्रास नागरिकांना व विद्यार्थ्यांना होत आहे. जिल्ह्यातील प्रवासी व विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी व सुरक्षिततेच्या दृष्टीने एक छोटासा निर्णय म्हणून नवीन बसेसकरिता तात्काळ उपाययोजना करावी, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली.

याबाबतचे निवेदन विभागीय नियंत्रक अशोक वाडीभस्मे यांना देण्यात आले. यावेळी अ.भा.ग्राहक पंचायतचे अध्यक्ष चंद्रकांत पतरंगे, सचिव उदय धकाते, संघटक विजय कोतपल्लीवार, अरुण पोगळे आदी उपस्थित होते.