गडचिरोली : जिल्ह्यातील भामरागड तालुक्यातील ताडगाव आणि कियर जंगल परिसरात पोलिस पथक नक्षलविरोधी अभियान राबवत असताना विविध गुन्ह्यांमध्ये हव्या असलेल्या तीन जहाल नक्षलवाद्यांना अटक करण्यात त्यांना यश आले. सरजु ऊर्फ छोटू बंडू महाका, मधु ऊर्फ अनु महारु कुमोटी आणि अशोक लाला तलांडी अशी त्या नक्षलवाद्यांची नावे आहेत. त्यांच्यावर खून, चकमकी, घातपाती कारवाया असे अनेक गुन्हे नोंद आहेत. प्रत्येकावर २ लाख रुपयांचे इनाम ठेवण्यात आले होते. रविवारी न्यायालयाने त्यांना तीन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे.
गोपनिय खबरीच्या आधारे भामरागड उपविभाग हद्दीतील ताडगाव पोलिस मदत केंद्राच्या हद्दीतील जंगलात विशेष अभियान पथकाचे जवान नक्षलविरोधी अभियान राबवित असताना सरजू आणि मधु हे दोन नक्षलवादी आढळले. याचसोबत पोलिस मदत केंद्र नारगुंडा हद्दीतील कियर जंगल परिसरात छत्तीसगडमधील जहाल माओवादी अशोक लाला तलांडी याला केंद्रीय राखीव पोलिस दल आणि विशेष अभियान पथकाच्या जवानांनी अटक केली. २ वर्षापासून तो स्वत:च्या घरी राहून माओवादी चळवळीमध्ये अधून-मधून प्रत्यक्ष व अप्रत्यक्षरित्या कार्यरत होता.
गडचिरोली पोलिस दलाच्या प्रभावी कारवाईमुळे जानेवारी 2022 ते आतापर्यंत 70 नक्षलवाद्यांना अटक करण्यात गडचिरोली पोलिस दलास यश आले आहे. ही कारवाई पोलिस अधीक्षक नीलोत्पल, अपर पोलिस अधीक्षक (अभियान) अनुज तारे, अपर पोलिस अधीक्षक (प्रशासन) कुमार चिंता, अपर पोलिस अधीक्षक (अहेरी) यतिश देशमुख तसेच उपविभागीय पोलिस अधिकारी (भामरागड) नितिन गणापुरे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली.