अरविंद सा.पोरेड्डीवार यांचा सहकारातील प्रतिष्ठेच्या जीवनगौरव पुरस्काराने सन्मान

नाशिकमध्ये सुरेश प्रभू यांच्या हस्ते प्रदान

गडचिरोली : दि महाराष्ट्र राज्य सहकारी बँक्स असोसिएशन मुंबईच्या वतीने राज्याच्या सहकारी क्षेत्रातील प्रतिष्ठेचा कै.विष्णूअण्णा पाटील जीवनगौरव पुरस्कार ज्येष्ठ सहकार नेते अरविंद सावकार पोरेड्डीवार यांना प्रदान करण्यात आला. शनिवारी (दि.९) नाशिक येथील गोखले इन्स्टिट्युटमधील भव्य अशा गुरूदक्षिणा सभागृहात या शानदार समारंभाचे आयोजन केले होते.

केंद्र सरकारच्या सहकार मंत्रालयाच्या न्यु ड्राफ्ट पॅालिसीचे चेअरमन तथा माजी केंद्रीय मंत्री सुरेश प्रभू यांच्या प्रमुख उपस्थितीत झालेल्या या समारंभाला राज्याचे सहकार आयुक्त कवडे, महाराष्ट्र राज्य सहकारी बँक्स असोसिएशनचे पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी जी-२० परिषदेमुळे केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॅा.भागवत कराड आणि केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण राज्यमंत्री डॅा.भारती पवार हे उपस्थित राहू शकले नाही, मात्र त्यांनी व्हिडीओ संदेशातून आपल्या भावना व्यक्त करत अरविंद सा.पोरेड्डीवार यांचे अभिनंदन केले.

सुरेश प्रभू यांच्या हस्ते सन्मानचिन्ह आणि सन्मानपत्र देऊन पोरेड्डीवार यांना सन्मानित करण्यात आले. यावेळी सत्काराला उत्तर देताना त्यांनी सहकार क्षेत्रातील आपले अनुभव सांगितले. गडचिरोलीसारख्या दुर्गम भागात जिल्हा सहकारी बँकेला यशाच्या शिखरावर पोहोचवण्यासाठी अनेक अडचणींवर मात करत यश मिळवावे लागले. या यशात बँकेशी निगडीत सर्व घटकांचे योगदान असल्याचे सांगत त्यांनी सर्वांचे आभार व्यक्त केले.