अहेरी : ‘प्रधानमंत्री टीबीमुक्त भारत अभियाना’अंतर्गत अहेरी विधानसभा क्षेत्रातील टीबीवर उपचार घेत असलेल्या व्यक्तींना माजी पालकमंत्री अंब्रिशराव आत्राम यांनी नि-क्षय मित्र म्हणून पाठिंबा देण्यासाठी नोंदणी करत बहुमोल सहकार्य केले. त्यामुळे भारत सरकारच्या आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाद्वारा उपमहासंचालक, टीएच यांच्या स्वाक्षरीने सन्मानपत्र देण्यात आले.
अहेरी येथील रुक्मिणी महालात अहेरी तालुक्याचे क्षयरोग पर्यवेक्षक विजय पोरेड्डीवार आणि सामाजिक कार्यकर्ते पंकज नौनुरवार यांनी अम्ब्रिशराव यांना सन्मानपत्र प्रदान केले. अहेरी येथील उपजिल्हा रुग्णालयात नोंद झालेल्या क्षय रुग्णांना प्रधानमंत्री टी.बी.मुक्त भारत अभियानाअंतर्गत बनलेले ‘नि-क्षय मित्र’ अंब्रिशराव आत्राम यांच्याकडून गरजवंत क्षयरुग्णांना पोषण आहार किटचे वाटप करणे सुरू आहे.
तालुका आरोग्य अधिकारी डॉ.किरण वानखेडे यांच्या मार्गदर्शनाखाली अहेरी तालुक्यातील गर्जुवांत क्षयरोग पीडितांना आत्राम यांनी पुढील सहा महिन्यासाठी दत्तक घेऊन त्यांचे पालकत्व स्वीकारले आहे. गरजवंत क्षयरुग्णांना पुढेही देशहितासाठी सर्वतोपरी सहकार्य करत करू, असे मनोगत त्यांनी व्यक्त केले.
राष्ट्रपतींनी नि-क्षय मित्र उपक्रम सुरू केला आहे. याअंतर्गत लोकप्रतिनिधी, कॉर्पोरेट सेक्टर, स्वयंसेवी संस्था आणि सामाजिक व्यक्तींनी दाता म्हणून पुढे यावे, असे आवाहन राष्ट्रपती द्रोपती मुर्मू यांनी केले होते. त्यामुळे नि-क्षय मित्र बनून या चळवळीला पाठींबा द्यावा आणि या योजनेबाबत चर्चा करण्यासाठी मेळावे आयोजित करावेत. त्यात अहेरी तालुका आरोग्य विभागाचे सहकार्य असेल, असे आवाहन आरोग्य विभागामार्फत तालुका आरोग्य अधिकाऱ्यांनी केले आहे.