आरमोरी : गडचिरोली जिल्ह्यातील प्रतिष्ठेच्या समजल्या जाणाऱ्या, मनोहर शिक्षण प्रसारक मंडळ आरमोरीच्या वतीने दिला जाणारा सन २०२३ चा महात्मा गांधी मानवसेवा पुरस्कार महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे सरचिटणीस ॲड.रवींद्र दरेकर यांना प्रदान करण्यात आला. यापूर्वी हा पुरस्कार डॉ.राणी बंग, गिताचार्य लक्ष्मणदादा नरखेडे , माजी आमदार हरिराम वरखेडे यांना प्रदान करण्यात आला होता.
याप्रसंगी आपले मनोगत व्यक्त करताना दरेकर यांनी महात्मा गांधींच्या व्यक्तिमत्त्वातील सत्य, अहिंसा आणि प्रेम या मूल्यांचा अंत कदापिही होणार नाही, कारण गांधी केवळ व्यक्ती नाही तर गांधी हा विचार आहे. गांधी यांचे जीवन समाजाने आत्मसात करणे आजच्या वर्तमानाची गरज असताना गांधींविषयी गैरसमज निर्माण करून विष पेरण्याचे कार्य विशिष्ट पक्ष आणि गटाकडून होत आहे. असे असले तरी गांधी संपणार नाही हे तितकेच सत्य आहे, असे ते म्हणाले.
स्थानिक महात्मा गांधी कला, विज्ञान व स्व.न.पं. वाणिज्य महाविद्यालय आरमोरी येथे आयोजित या समारंभाच्या अध्यक्षस्थानी मनोहरभाई शिक्षण प्रसारक मंडळ आरमोरीचे सचिव मनोज वनमाळी तर, प्रमुख वक्ते म्हणून माजी प्राचार्य डॉ.नामदेव कोकोडे, संस्थेचे उपाध्यक्ष नुरअली पंजवानी, दीपक बेहरे, दीपक वनमाळी, मयूर वनमाळी, निशांत वनमाळी, प्राचार्य डॉ.लालसिंग खालसा, कनिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य साईनाथ अद्दलवार, प्रकाश पंधरे, नितीन कासार, सांस्कृतिक विभागाचे प्रमुख प्रा.शशिकांत गेडाम उपस्थित होते.