महामोर्चात सहभागी जिल्हाभरातील नागरिकांच्या नास्ता-पाण्यासाठी सरसावले अनेक हात

राजकीय क्षेत्रातील पदाधिकाऱ्यांचा पुढाकार

गडचिरोली : दोन दिवसांपूर्वी गडचिरोलीत काढण्यात आलेल्या कुणबी महामोर्चात जिल्हाभरातील हजारो लोकांनी उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदविला. शिवाजी महाविद्यालयापासून जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत निघालेल्या या भव्य मोर्चात पायी चालत सहभागी झालेल्या नागरिकांसाठी काही सामाजिक आणि राजकीय पदाधिकाऱ्यांनी नास्ता-पाण्याची सोय केली होती.

ग्रामीण भागातून सकाळीच लोक गडचिरोलीकडे निघाले असल्याने अनेक जण जेवण करून आलेले नव्हते. ही बाब लक्षात घेऊन जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष मनोहर पोरेटी मित्र परिवारासह काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष महेंद्र ब्राह्मणवाडे, मधुकर दोनाडकर, शालिग्राम पत्रे, तेजस मडावी यांनी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या मार्गावरील कृषी महाविद्यालयाजवळ मसालेभाताची व्यवस्था केली होती. मोर्चात सहभागी शेकडो कुणबी आणि ओबीसी बांधवांनी याचा लाभ घेतला. सतीश त्रिनगरीवार यांच्यासह काही सामाजिक कार्यकर्त्यांनी यासाठी हातभार लावला.