गडचिरोली : ग्रामपंचायत स्तरावर लागणाऱ्या विविध साहित्याची खरेदी करताना काही अधिकारी-कर्मचारी संघटनेचे पदाधिकारी असलेल्या काही विस्तार अधिकाऱ्यांकडून ग्रामपंचायतींवर दबाव टाकून विशिष्ट ठिकाणावरूनच साहित्य खरेदी करण्यास सांगितले जात आहे. त्यामुळे व्यापारी आणि उद्योजकांमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे. संघटनेच्या मूळ उद्देशाला बाजुला ठेवत आपल्या अधिकाराचा गैरवापर करत स्वत:चा स्वार्थ साधण्याच्या या वृत्तीमुळे कर्मचाऱ्यांमध्येही नाराजीची कुजबूज सुरू आहे.
जिल्ह्यात कार्यरत अनेक संघटनांचे पदाधिकारी कर्मचाऱ्यांच्या हितासाठी झटत आहेत. पण काही वरिष्ठ संवर्गाचे पदाधिकारी जिल्ह्यातील विविध तालुक्यात असणाऱ्या समकक्ष अधिकाऱ्यांना, ग्रामपंचायतींमधील कर्मचाऱ्यांना फोन करून विशिष्ट ठिकाणावरून साहित्य खरेदी करण्यासाठी दबाव टाकत आहेत. सेवानिवृत्तीच्या उंबरठ्यावर असतानाही त्यांना स्वहिताचा मोह सुटत नसल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
या प्रकारामुळे जिल्ह्यातील स्थानिक उद्योजकांच्या व्यवसायावर परिणाम होऊन त्यांच्यात असंतोष पसरत आहे. प्रशासनाने याची वेळीच दखल घ्यावी आणि संबंधितांना योग्य समज द्यावी अशी मागणी उद्योग समुह संघटनेकडून करण्यात आली आहे.
संघटनेच्या सदर पदाधिकाऱ्यांकडून पदोन्नतीसाठी आणि शासन निर्णय बदलवून आणण्यासाठी मंत्रालयस्तरावर देवाण-घेवाण करावी लागते, असे म्हणून आपल्याच लोकांकडून पैसेही उकळले जात असल्याची चर्चा आहे. काम झाले नाही तर पैसे परत करण्याची हमी देणाऱ्यांनी काही जणांचे काम झाले नाही तरीही त्यांचे पैसे परत केले नसल्यामुळे संबंधित कर्मचाऱ्यांमध्ये रोष व्यक्त केला जात आहे.