गडचिरोली : कोणतेही वाहन सोयीसाठी असले तरी काही जण त्याचा उपयोग शौकासाठी करतात. अशाच काही शौकिनांची नशा अहेरी पोलिसांनी उतरविली. नियमबाह्यपणे बुलेटच्या सायलेन्सरमधून कर्णकर्कश आवाजात फटाके उडविणाऱ्यांचे सायलेन्सर काढून घेऊन त्यांच्यावर रोड रोलर चालवल्यामुळे दुचाकीधारकांना चांगलाच धडा मिळाला आहे.
अहेरी पोलिस स्टेशनला नव्याने रुजू झालेले निरीक्षक दशरथ वाघमोडे यांच्या निर्देशानुसार पोलिसांनी कागदपत्रे नसलेल्या, फॅन्सी नंबरप्लेट असलेल्या वाहनांविरोधात धडक कारवाईची मोहीम सुरू केली आहे. या कारवाईदरम्यान फटाके फुटल्यासारखा कर्णकर्शक आवाज करत चालणाऱ्या 6 बुलेट पोलिसांना आढळल्या. त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करत हे सायलेन्सर काढून घेण्यात आले. एवढेच नाही तर रोड रोलरखाली ते सायलेन्सर कुस्करून टाकले.
काही दिवसांपासून अशा शौकिनबाजांमुळे अहेरी, आलापल्लीतील नागरिक चांगलेच त्रस्त झाले होते. त्यामुळे पोलिसांच्या या कारवाईचे सर्वत्र स्वागत होत आहे. दरम्यान अशा पद्धतीने कोणीही नियमांचा भंग करू नये. वाहन कंपनीकडून मिळालेले साधेच सायलेन्सर गाडीला बसवावे आणि कायदेशिर कारवाई टाळावी, असे आवाहन ठाणेदार दशरथ वाघमोडे यांनी केले आहे.