रानटी हत्तीच्या हल्ल्याचा आणखी बळी, शेतातल्या झोपडीतील महिलेला चिरडले

राष्ट्रवादी काँग्रेसचा वनविभागावर ठपका

गडचिरोली : आरमोरी तालुक्यातील शंकरनगर गावालगतच्या शेतात मध्यरात्री रानटी हत्तींच्या कळपाने आक्रमण केले. यावेळी शेतातील एका झोपडीतील वृद्ध महिलेला हत्तींनी चिरडले. या घटनेसाठी वनविभागाचे स्थानिक अधिकारी आणि कर्मचारी जबाबदार असल्याचा आरोप करत त्यांच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष दिलीप मोटवानी यांनी केली आहे.

गेल्या एक आठवड्यापासून रानटी हत्तींचा कळप आरमोरी तालुक्यात धुमाकूळ घालत आहे. आतापर्यंत शेतातील उभ्या पिकांची नासाडी या हत्तींकडून केली जात होती. पण आता शेतात खरीपाचे पीक नसल्यामुळे या हत्तींनी आपला मोर्चा जंगलालगतच्या गावांकडे वळविला आहे. गेल्या आठवड्यात काही घरांचेही नुकसान हत्तींनी केले होते. अशातच शंकरपूर या बंगालीबहुल गावातील मंडल कुटुंब शेतातच झोपडीवजा घरात राहात होते. रात्री हत्ती आल्याची चाहुल लागल्यानंतर त्यांची पळापळ झाली. पण कौसल्या राधाकांत मंडल ही वृद्ध महिला हत्तींच्या तावडीत सापडली.

वनविभागाचे दुर्लक्ष कारणीभूत?

आरमोरी तालुक्यातील शंकरनगर, पळसगाव, पाथरगोटा परिसरात रानटी हत्तींचा वावर होता. असे असताना या वनक्षेत्रातील कर्मचाऱ्यांनी गावकऱ्यांना कुठलीच कल्पना दिली नाही. त्यामुळे मंडल कुटुंब पाड्यावर मुक्कामी होते. यातून सदर महिलेचा बळी गेला. या दुर्घटनेसाठी वनविभागाचा हलगर्जीपणाच कारणीभूत आहे, असा आरोप आरमोरी येथील राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष दिलीप मोटवानी यांनी केला आहे. यासंदर्भात त्यांनी पोलिसांत तक्रार देऊन वनपरिक्षेत्र अधिकारी आणि वनपाल व वनरक्षकाविरूद्ध सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे.