गडचिरोली : राष्ट्रीय पोलिस मिशनअंतर्गत केंद्रीय गृह मंत्रालयाच्या वतीने राबविला जात असलेला स्टुडंट पोलिस कॅडेट प्रोग्राम यावर्षी पहिल्यांदाच गडचिरोलीत राबविण्यात आला. या उपक्रमांतर्गत इयत्ता आठवी आणि नववी मधील निवडक विद्यार्थ्यांना पाच दिवसीय निवासी प्रशिक्षण देण्यात आले. या प्रशिक्षणातून बाहेर पडणारे विद्यार्थी चांगले नागरिक आणि व्हिजनरी विद्यार्थी बनून बाहेर पडतील, असा विश्वास पोलिस अधीक्षक नीलोत्पल यांनी व्यक्त केला.
या प्रशिक्षणात आंतरवर्ग, बाह्रवर्ग आणि क्षेत्रीय भेटी आयोजित करुन विद्यार्थ्यांना व्यक्तिमत्व व नितिमत्ता विकासाला उपयुक्त असे प्रशिक्षण देण्यात आले. तसेच या उपक्रमांतर्गत विद्यार्थ्यांना नितीमुल्यांचे महत्व शिकविण्यात आले. संयम, सहनशिलता, शिस्त व सकारात्मक दृष्टीकोन, नैतिक प्रामाणिकपणा आदी मुल्यांची जडणघडण होण्यासाठी विविध मान्यवरांनी त्यांना मार्गदर्शन केले.
या प्रशिक्षणात गुन्हे प्रतिबंध व उपाययोजना, भ्रष्टाचारविरोधी लढा, कम्युनिटी पोलिसिंग, सुरक्षा व रहदारी जागरुकता, नक्षलवाद विरोधात विद्यार्थ्यांची भूमिका या विषयांवर मार्गदर्शन करण्यात आले. त्यासोबत पोलिस विभागातील अत्याधुनिक हत्यांराबाबत माहिती देण्यात आली. तसेच पुरपरिस्थिती उद्भवल्यास आपत्ती व्यवस्थापन व निवारण दल कशा पद्धतीने लोकांना मदत करतात याचे प्रात्यक्षिक, पोलिस दलाच्या वतीने श्वानपथकाच्या मदतीने बॉम्ब शोध व गुन्ह्राच्या तपासात श्वानाचे काय महत्व आहे याबाबत मार्गदर्शन करण्यात आले.
यासोबतच विद्यार्थ्यांनी ट्रॅकिंग, योगा, शारीरिक कवायत कार्यक्रम, पथसंचलन, कबड्डी, व्हॉलीबॉल, 100 मी धावणे, 400 मी.धावणे, वक्तृत्व, गायन, समुह नृत्य, वाद-विवाद व समाजातील दुष्ट चालीरिती या विषयांवर पथनाट असे विविध कार्यक्रम व स्पर्धाही घेण्यात आल्या.
पथसंचलनाने शानदार समारोप
निवासी प्रशिक्षण शिबिराच्या समारोपप्रसंगी स्टुडंट पोलिस कॅडेट यांच्या शिस्तबध्द पथसंचलनाचे निरीक्षण पोलिस अधीक्षक नीलोत्पल यांनी केले. त्यानंतर एकलव्य हॉल येथे बक्षीस वितरण व समारोपीय कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. प्रास्ताविक अपर पोलिस अधीक्षक कुमार चिंता यांनी करून विद्यार्थ्यांनी केलेल्या पथसंचलनाचे कौतुक केले.
सदर कार्यक्रमासाठी नागरी कृती शाखेचे प्रभारी अधिकारी पो.उपनिरीक्षक धनंजय पाटील, उपनिरीक्षक भारत निकाळजे, तसेच सर्व पोलीस अंमलदारांनी विशेष परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन जनसंपर्क कार्यालयाचे पो.उपनिरीक्षक शिवराज लोखंडे यांनी केले.