आरोग्य केंद्राच्या इमारतीचा सज्जा तुटला, खाली कोसळून पेंटरचा जीव गेला

'आयुष्य' रेखाटताना तुटली आयुष्याची दोरी

कोरची : मृत्यू कोणाला कुठे आणि कसा गाठेल याचा काहीही नेम नसतो. अशीच एक घटना कोरची तालुक्यातील बोटेकसा येथे घडली. प्राथमिक आरोग्य केंद्राच्या इमारतीवर ‘आयुष्यमान भारत आरोग्य मंदिर’ असे नामफलक रेखाटत असतानाच सज्जा कोसळून पेंटरचा दुर्दैवी मृत्यू झाला. सुरेश तुकाराम कराडे (५५ वर्ष), रा.कोचीनारा असे त्या पेंटरचे नाव आहे.

प्राप्त माहितीनुसार, राज्य शासनाने आरोग्य विभागाच्या प्राथमिक आरोग्य केंद्रांवर पूर्वी आयुष्यमान भारत आरोग्यवर्धिनी केंद्र असे नाव होते ते बदलून आयुष्यमान भारत आरोग्य मंदिर असे नाव लिहिण्याचे आदेश काढले. बोटेकसा येथील केंद्रावर नाव लिहिण्यासाठी पेंटर सुरेश कराडे यांना जबाबदारी देण्यात आली होती. गुरूवारी दुपारी कराडे हे नामफलक लिहीत असतानाच एकाएकी सज्जा सुटला आणि पेंटर सुरेश कराडे खाली कोसळले.

डोक्याला जबर मार लागल्याने त्यांना तात्काळ कोरची ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. डॅा.राहुल राऊत यांनी प्राथमिक उपचार करून डोक्याला गंभीर मार असल्याने गडचिरोली जिल्हा सामान्य रुग्णालयात रेफर केले. पण गडचिरोलीला नेले जात असताना वाटेतच त्यांचा मृत्यू झाला. कराडे यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा, एक मुलगी आणि बराच मोठा परिवार आहे.

इमारतीच्या बांधकामाची चौकशी होणार का?

बोटकसा प्राथमिक आरोग्य केंद्राच्या इमारतीचे बांधकाम २०१६ मध्ये करण्यात आले होते. परंतु हे बांधकाम निकृष्ट दर्जाचे असल्यामुळे अधिकाऱ्यांनी इमारतीचा ताबा घेण्यास नकार दिला होता हे विशेष. या घटनेत इमारतीच्या दर्शनी भागावरील सज्जा तुटल्याने इमारतीच्या बांधकामाचा दर्जा पुन्हा एकदा निकृष्ट असल्याचे सिद्ध झाले. पेंटर कराडे यांच्या नातेवाईकांनी कोरची पोलिस स्टेशनला याप्रकरणी तक्रार देऊन इमारतीचे बांधकाम करणाऱ्या कंत्राटदार व अभियंत्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे.