गडचिरोली : समाजातील बदलत्या वातावरणाशी जुळवून घेण्याची क्षमता भारतीय संविधानात आहे. घटनादुरुस्तीची प्रक्रिया आणि भविष्यातील पिढ्यांना त्यांच्या समाजासाठी मानके ठरवण्याचे सामर्थ्यही संविधानात आहे. भारतातील विविधतेला जोडण्यात यशस्वी ठरलेले भारतीय संविधान हे जगातील सर्वात जास्त काळ चालणारे संविधान आहे, असे प्रतिपादन नागपूर विद्यापीठाच्या राज्यशास्त्र विभागाचे सहयोगी प्राध्यापक डॉ.विकास जांभुळकर यांनी गोंडवाना विद्यापीठात आयोजित व्याख्यानात केले.
संविधान दिनानिमित्त गोंडवाना विद्यापीठाच्या डॅा.बाबासाहेब आंबेडकर अध्यासन केंद्रातर्फे डॅा.जांभुळकर यांचे व्याख्यान आयोजित केले होते. भारतीय राज्यघटनेचे महत्त्व आणि त्याची प्रासंगिकता या विषयावर व्याख्यानातून प्रकाश टाकण्यात आला.
कुलगुरू डॉ.प्रशांत बोकारे म्हणाले, भारतीय राज्यघटना गेली 75 वर्षे जीवंत आहे आणि ती इतकी मजबूत आहे की ती पुढील हजारो वर्षे स्वत:ला जीवंत ठेवेल. शेवटी कृतज्ञता व्यक्त करताना कुलसचिव डॉ.अनिल हिरेखण म्हणाले, राज्यघटनेतील मूल्ये लोकांपर्यंत पोहोचवणे हा विद्यापीठाचा उद्देश आहे. संविधानाच्या जिवंत शक्तीचे उदाहरण म्हणजे सर्वोच्च न्यायालयाने नुकताच दिलेला निर्णय, ज्यामध्ये समानता आणि धर्मनिरपेक्षता हे शब्द काढून टाकण्यास त्यांनी सक्त नकार दिला आहे.
या कार्यक्रमात केंद्राचे समन्वयक डॉ.बारसागडे यांनी संविधान निर्मिती हे ऐतिहासिक कार्य असल्याचे सांगून प्रतिकूल परिस्थितीतही 2 वर्षे 11 महिने आणि 18 दिवसांत तयार झालेला हा दस्तऐवज गेली 75 वर्षे भारतासाठी प्रेरणादायी ठरत असल्याचे सांगितले.
कार्यक्रमाचे संचालन डॉ.सविता गोविंदवार यांनी केले. गोंडवाना विद्यापीठात आयोजित केलेला हा कार्यक्रम भारतीय राज्यघटनेचे महत्त्व समजून घेऊन ते जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवण्याचा एक स्तुत्य प्रयत्न ठरला आहे.