महाशिवरात्रीनिमित्त वांगेपल्लीच्या मंदिरात तीन राज्यातील भाविकांची मांदियाळी

अम्ब्रिशराव आत्राम यांनी केली सोय

अहेरी : नजीकच्या वांगेपल्ली गावालगत वाहणाऱ्या प्राणहिता नदीच्या काठावर प्राचीन महादेवाचे मंदिर आहे. या ठिकाणी दरवर्षीप्रमाणे याही वर्षी महाशिवरात्रीनिमित्त भाविकांची मोठी गर्दी झाली होती. येणाऱ्या भाविकांची गैरसोय होऊ नये म्हणून माजी राज्यमंत्री अम्ब्रिशराव आत्राम यांनी काळजी घेतल्याचे दिसून आले.

महाराष्ट्र आणि तेलंगाणा राज्याचे विभाजन करत वाहणाऱ्या प्राणहिता नदीच्या काठावर ही जत्रा भरते. प्राणहिता नदीपात्रात शाहीस्नान करून भाविक महादेव मंदिरात दर्शन घेतात. यंदाही महाराष्ट्र, तेलंगाणा आणि छत्तीसगड या तीन राज्यातील भाविक पहाटेपासून या ठिकाणी दर्शनासाठी येत होते.

अहेरी नगरीत विविध ठिकाणावरून येणाऱ्या भाविकांची गैरसोय होणार नाही याची काळजी घेण्याची सूचना अम्ब्रिशराव आत्राम यांनी भाजपचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना केली होती. त्याअनुषंगाने वांगेपल्ली येथील घाटावर महाप्रसाद, साबुदाणा वडे, रताळ, दूध, केळी आणि थंड पाण्याची व्यवस्था करण्यात आली. विशेष म्हणजे गरमागरम पदार्थ मिळाल्याने भाविकांनी समाधान व्यक्त केले.

भाविकांसाठी सतत स्टॉल सुरू ठेवून नवनवीन पदार्थ खायला घातले. फळ व विविध खाद्यपदार्थ वाटप केले. एवढेच नव्हे तर महिला पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी स्वतः खाद्यपदार्थ तयार केले. या कामासाठी अहेरी परिसरातील भाजपचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले.