जिल्ह्यातील शिवालयांमध्ये महादेवाचा गजर, मार्कंडेश्वर देवस्थानात सर्वाधिक गर्दी

ना.धर्मरावबाबांसह खा.नेते यांची हजेरी

गडचिरोली : महाशिवरात्रीच्या पर्वावर शुक्रवारी (दि.८) जिल्हाभरातील शिवमंदिरांमध्ये दर्शनासाठी भाविकांनी एकच गर्दी केली. ‘हर हर महादेव…’च्या गजराने सर्व शिवालये गजबजून गेली होती. चामोर्शी तालुक्यातील प्रसिद्ध मार्कंडेश्वर मंदिरात सर्वाधिक गर्दी झाली. खासदार अशोक नेते यांनी पहाटे सपत्निक महापुजा केली. त्यानंतर अन्न व औषध प्रशासनमंत्री धर्मरावबाबा आत्राम, आणि नंतर विधानसभेचे विरोधीपक्ष नेते विजय वडेट्टीवार यांनीही मार्कंडेश्वराचे दर्शन घेऊन पुजाअर्चा केली. रात्री उशिरापर्यंत भाविकांच्या रांगा कायम होत्या.

महाशिवरात्री उत्सवानिमित्त मार्कंड्यात मोठी जत्रा भरली असून मोठ्या प्रमाणावर दुकानेही सजली आहेत. गडचिरोलीसह चंद्रपूर आणि इतरही जिल्ह्यातून भाविकांनी येथे गर्दी केल्याचे पहायला मिळाले.

पहाटे झाली जोडप्यांच्या हस्ते पारंपरिक पुजा

मार्कंडेश्वर मंदिरात खासदार अशोक नेते यांच्यासह इतर काही जोडप्यांनी पारंपरिक पद्धतीने पहाटे सपत्निक गाभाऱ्यातील पिंडीवर अभिषेक आणि महापुजा केली. यावेळी आ.डॉ.देवराव होळी, पूज्य मुरलीधर महाराज, उपविभागीय अधिकारी उत्तम तोडसाम, तहसीलदार प्रशांत घारूडे, गटविकास अधिकारी सागर पाटील, भाजपचे लोकसभा विस्तारक बाबुराव कोहळे, मार्कंडा देवस्थान समितीचे अध्यक्ष गजानन भांडेकर, नाना महाराज आमगांवकर, पांडे महाराज, अवधूत महाराज आमगावकर, चामोर्शीच्या नगराध्यक्ष जयश्री वायलालवार, उपनगराध्यक्ष चंद्रकांत बुरांडे, पंकज वायलालवार, अमोल गण्यारपवार, तसेच अर्चना अ.नेते, पुष्पा लाडवे आदींनी पुजेत सहभाग घेतला. यावेळी खा.नेते यांनी भाविकांना महाशिवरात्रीच्या शुभेच्छा देत जिल्हावासियांच्या सुख-समृद्धीसाठी प्रार्थना केली.

धर्मरावबाबा यांनी केले महाप्रसादाचे वितरण

ना.धर्मरावबाबा आत्राम यांनी श्रीक्षेत्र मार्कंडेश्वर मंदिरात जाऊन महादेवाचे दर्शन घेतले. यावेळी त्यांनी नागरिकांच्या सुख समृद्धीसाठी प्रार्थना केली. त्यानंतर त्यांनी भाविकांशी संवाद साधला. तसेच महाप्रसादाचेही वितरण केले. दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांना आवश्यक सोयीसुविधा पुरविण्याच्या सूचना त्यांनी स्थानिक प्रशासनाला केल्या. तत्पुर्वी मंदिर प्रशासन समितीतर्फे त्यांचे स्वागत करण्यात आले.