गडचिरोली : चामोर्शी तालुक्यातील पुरातन मार्कंडेश्वर मंदिराच्या बहुप्रतीक्षित जिर्णोद्धाराच्या कामाला ठरल्याप्रमाणे शुक्रवारी खासदार अशोक नेते यांच्या हस्ते मोठ्या उत्साहात सुरूवात करण्यात आली.
मार्कंडेश्वरावर मनोभावे श्रद्धा असणाऱ्या लाखो भाविकांमध्ये मी सुद्धा एक महादेवाचा भक्त आहे. त्यामुळे या मंदिराच्या जिर्णोद्धाराचे काम लवकरात लवकर पूर्ण व्हावे यासाठी मी दिल्लीत पुरातत्व विभागाकडे सातत्याने पाठपुरावा करीत होतो. कोणत्याही परिस्थितीत महाशिवरात्रीपूर्वी हे काम सुरू करा, अशी तंबीच मी संबंधित अधिकाऱ्यांना दिली होती. त्यानंतर १ मार्चला हे काम पुन्हा सुरू होणार, असा शब्द मी दोन आठवड्यापूर्वी मार्कंडावासियांना दिला होता. तो शब्द पाळल्याचे समाधान मला आहे, अशी भावना खासदार अशोक नेते यांनी मार्कंडेश्वर मंदिरातील सोहळ्याप्रसंगी व्यक्त केली.
प्रचंड उत्साहात, भजन दिंडीसह आणि मंगलमय वातावरणात मंदिर जिर्णोद्धाराच्या कामाला पुन्हा सुरूवात करण्यात आली. या सोहळ्यामुळे जिर्णोद्धाराचे काम मार्गी लागावे यासाठी उपोषणाला बसलेले मुरलीधर महाराज यांनी आपल्या उपोषणाची सांगता केली. खा.अशोक नेते यांनी त्यांना लिंबूपाणी दिले.
यावेळी मार्कंडेश्वर मंदिराच्या गाभाऱ्यात पुजाअर्चा करण्यात आली. अनेक वर्षानंतर या कामाला सुरूवात होत असल्याने नागरिकांमध्ये मोठ्या उत्साहाचे वातावरण होते.
मंदिराच्या बांधकामासोबत परिसरातील नागरिकांसाठी विविध सोयीसुविधा निर्माण केल्या जाणार आहेत. पुरातत्व विभागाच्या परवानगीने ती कामेही लवकरच सुरू केली जातील, असा विश्वास यावेळी खा.नेते यांनी व्यक्त केला.
या कार्यक्रमाला सुनील शास्त्री महाराज, नागापुरे महाराज, पुरातत्व विभागाचे नागपूर विभागीय अधीक्षक अरुण मलिक, अतिरिक्त अधीक्षक आलोक त्रिपाठी, उपविभागीय अधिकारी उत्तम तोडसाम, तहसीलदार प्रशांत धोंडे, ठाणेदार विश्वास या अधिकाऱ्यांसह भाजपचे जिल्हाध्यक्ष प्रशांत वाघरे, लोकसभा विस्तारक बाबुराव कोहळे, जिल्हा महामंत्री गोविंद सारडा, जिल्हा महामंत्री प्रकाश गेडाम, महिला मोर्चाच्या प्रदेश सचिव रेखा डोळस, महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्ष गिता हिंगे, किसान मोर्चाचे जिल्हाध्यक्ष रमेश बारसागडे, सहकार प्रकोष्ठ जिल्हाध्यक्ष आशिष पिपरे, तालुकाध्यक्ष आनंद भांडेकर, शहराध्यक्ष सोपान नैताम, जिल्हा सचिव दिलीप चलाख, प्रदेश कामगार आघाडीचे गोवर्धन चव्हाण, गजानन भांडेकर, संजय पंदीलवार, माणिक कोहळे, भास्कर बुरे, रेवनाथ कुसराम, नरेश अल्सावार, नामदेव सोनटक्के, साईनाथ बुरांडे, तसेच मोठ्या संख्येने भाविक व गावातील नागरिक उपस्थित होते.