गडचिरोली : मराठी भाषा गौरव दिन तथा वि.वा.शिरवाडकर यांच्या जयंतीनिमित्त दि.5 मार्च रोजी गोंडवाना विद्यापीठात झाडीबोली नाट्य संमेलनाचे आयोजन करण्यात येणार आहे. या नाट्यसंमेलनाअंतर्गत होणाऱ्या स्पर्धांमधून झाडीबोली नाट्यकलेचा जागर होणार आहे.
झाडीपट्टीतील सामाजिक समस्या, भाषा, बोली, आचार-विचार, संस्कृतीची ओळख आणि अभ्यास करण्याच्या दृष्टीने तसेच झाडीपट्टी रंगभूमीचे जतन व संवर्धन करण्याच्या उद्देशाने कुलगुरू डॉ.प्रशांत बोकारे यांच्या मार्गदर्शनात हे झाडीबोली नाट्यसंमेलन पार पडणार आहे.
नाट्य संमेलनाला अध्यक्ष म्हणून लेखक तथा नाट्य समीक्षक डॉ.श्याम मोहरकर, उद्घाटक पद्मश्री डॉ.परशुरामजी खुणे, प्रमुख अतिथी अनिरुद्ध वनकर, सदानंद बोरकर, तर नाट्य संमेलनाचे स्वागताध्यक्ष कुलगुरू डॉ.प्रशांत बोकारे राहणार आहेत.
प्र-कुलगुरू डॉ.श्रीराम कावळे, कुलसचिव डॉ.अनिल हिरेखन तसेच मानव व विद्याशाखा विभागाचे अधिष्ठाता ए.एस.चंद्रमौली यांचीही यावेळी उपस्थिती राहणार आहे. चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यातील विद्यार्थी-विद्यार्थिनींनी सदर नाट्य संमेलनात मोठ्या संख्येने सहभागी होऊन या संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन नाट्यसंमेलनाचे समन्वयक तथा मराठी विभागाचे प्रा.डॉ.निळकंठ नरवाडे यांनी केले आहे.
विविध स्पर्धा व पारितोषिके
या झाडीबोली नाट्यसंमेलनात एकांकिका, एकपात्री नाट्यछटा स्पर्धा घेण्यात येणार आहे. यामध्ये सर्वोत्कृष्ट एकांकिकेला 8 हजार रुपये, उत्कृष्ट एकांकिकेस 4 हजार, तर उत्तेजनार्थ एकांकिकेला 2 हजार रुपये तथा स्मृतिचिन्ह व प्रमाणपत्र दिले जाणार आहे. याशिवाय संहिता लेखन, दिग्दर्शन, स्त्री-पुरुष अभिनयासाठी प्रत्येकाला, तसेच एकपात्री अभिनय, नाट्यछटा यासाठीही रोख पारितोषिक दिले जाणार आहे.
स्पर्धेमध्ये सहभागी होण्यासाठी, तसेच प्रवेश अर्जासाठी प्रा.डॉ.निळकंठ नरवाडे यांच्याशी (9503081790, 8329394517) संपर्क साधण्याचे आवाहन विद्यापीठ प्रशासनाने केले आहे.