अन् भर जंगलात धावत्या बसमधील बॅटऱ्यांनी घेतला पेट, हाणी टळली

चालकाचे प्रसंगावधान, पहा व्हिडिओ

गडचिरोली : जिल्ह्यातील घोट ते मुलचेरा मार्गांवर एसटी महामंडळाच्या एका बसमधील बॅटऱ्यांनी अचानक पेट घेतला. बसमधून धूर येत असल्याचे लक्षात येताच चालक-वाहकांनी बस थांबवून तातडीने प्रवाशांना खाली उतरवले आणि झाडांच्या फांद्यांनी कशीबशी आग विझविली. यात कोणतीही जीवित हाणी झाली नसली तरी प्रवाशांना मनस्ताप सहन करावा लागला.

गडचिरोली आगाराची ही बस मुलचेरा येथे दररोज मुक्कामी जात असते. ती बस सकाळी ६ वाजता मुलचेरावरून घोट, चामोर्शीमार्गे गडचिरोलीला येते. शुक्रवारी (१ मार्च) ही एसटी बस नेहमीप्रमाणे प्रवाश्यांना घेऊन गडचिरोलीकडे निघाली होती. घोटच्या जंगलात बसच्या बॅटरीमधून धूर निघत असल्याचे लक्षात येताच चालक-वाहकांनी बसमधील ७ ते ८ प्रवाशांना खाली उतरविले. त्यांनी स्वतःचेही सामान खाली उतरवले. त्यानंतर बॅटऱ्यांनी पेट घेतला.

या बसमधील प्रवासी घाबरलेल्या अवस्थेत जंगलाच्या दिशेने जाऊन दूर उभे राहिले. चालक आणि वाहकांनी झाडांच्या फांद्या तोडून आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला. या घटनेनंतर मेकॅनिकला तिथे पाठवून गाडीच्या बॅटऱ्या बदलण्यात आल्या. इतर कोणतीही हाणी नसल्यामुळे ती बस चालवत गडचिरोलीला आणण्यात आल्याचे विभाग नियंत्रक स्मिता सुतवणे यांनी सांगितले.

विशेष म्हणजे गडचिरोली जिल्ह्यातील गडचिरोली आणि अहेरी या दोन आगारात नवीन बसेस नसल्याने जुन्याच बसेसवर काम भागविले जात आहे. त्यामुळे बसमध्ये तांत्रिक बिघाड होणे, भर रस्त्यात बस बंद पडणे, आग लागणे अशा घटना नित्याचेच झाले आहे.

एसटीच्या दुरवस्थेकडे लक्ष द्या- ब्राह्मणवाडे

जिल्ह्यातील एसटी बसेसच्या दुरवस्थेचे व्हिडिओ यापूर्वीही व्हायरल झाले आहेत. एकीकडे सरकारची स्तुती करणारी जाहिरात असणारे मोठमोठे पोस्टर बसेसवर लावून मोठ्या प्रमाणात खर्च केला जातो, मात्र बसगाड्या दुरुस्त करण्यासाठी सरकारकडे वेळ नाही, की पैसे नाही? असा सवाल या घटनेनंतर काँग्रेसचे गडचिरोली जिल्हाध्यक्ष महेंद्र ब्राह्मणवाडे यांनी उपस्थित केला आहे. सरकार गडचिरोली जिल्ह्यात विमानतळ बनविण्याची घोषणा करते, मात्र सर्वसामान्य गोरगरीब जनता ज्या एसटी बसेसने प्रवास करतात त्या बसेसची अवस्था सुधारू शकत नाही, हे जिल्ह्याचे दुर्दैव आहे, अशी भावना ब्राह्मणवाडे यांनी प्रसिद्धी पत्रकातून व्यक्त केली.