चार विवाहित मुलींनी खांदा देऊन केले आपल्या वडीलावर अंत्यसंस्कार

चिखली पेठची घटना झाली चर्चेचा विषय

देसाईगंज : म्हातारपणी काठीचा आधार म्हणून मुलगा हवा असा अनेकांचा आग्रह असतो. पण गडचिरोली जिल्ह्यातील एका वृद्ध आदिवासी दाम्पत्याला चारही मुलीच असल्याने वडीलांच्या मृत्यूनंतर मुलींनी अंत्यसंस्काराची जबाबदारी पार पाडली. अंत्ययात्रेत पार्थिवाला खांदा देण्यापासून तर अंत्यविधीपर्यंतचे सर्व सोपस्कार या विवाहित मुलींनीच पार पाडले. त्यामुळे परिसरात हा चर्चेचा विषय झाला आहे. ही घटना देसाईगंज तालुक्यातील चिखली पेठ या गावात घडली.

जन्मदात्या वडिलांच्या पार्थिवाला मुलांनीच खांदा देण्याची प्रथा आहे. पण चिखलीतील रहिवासी असलेल्या बाबुराव मडावी यांना चारही मुलीच आहेत. बाबुराव आणि केमाबाई या दाम्पत्याने काबाडकष्ट करून आपल्या कन्या उत्तरा, अनुताई, ललीता आणि निराशा यांना मोठं करून शिक्षण व संगोपन केले. एवढेच नाही तर थोड्याथोडक्या शेतीवर त्यांचेही लग्नही केले. अलिकडे वृद्धत्वामुळे मुलीच त्यांना सांभाळत होत्या.

दरम्यान 80 व्या वर्षी बाबूराव यांचे मंगळवारी निधन झाले. आईवडीलांसाठी त्यांच्या मुलीच मुलाप्रमाणे असल्यामुळे या मुलींनी वडीलांचे अंत्यसंस्कार आपणच करू असा निश्चय केला. त्यानुसार चारही मुलींनी तिरडीला खांदा दिला. माती देण्याचे पुढील कार्यही या मुलींनीच पार पाडले. या मुलींनी आपल्या आईचाही योग्य सांभाळ करण्याची शपथ अंत्यसंस्कारप्रसंगी घेतली. यामुळे अनेकांचे डोळे पाणावले होते.

दरम्यान बाबुराव मडावी हे श्री गुरुदेव जंगल कामगार सहकारी संस्थेचे सभासद असल्याने त्यांच्या अंत्यविधीसाठी संस्थेकडून आर्थिक मदत उपाध्यक्ष शेषराव कुमरे, संचालक धर्मराज मरापा, गोपाल खरकाटे यांच्या हस्ते देण्यात आली. ही संस्था अडचणीत सापडलेल्या प्रत्येक सभासदाच्या सुखदुःखात सहभागी होऊन विविध मार्गाने मदत करण्यास तत्पर असते.