शेतकऱ्यांकडून अधिकचे धान खरेदी, केंद्राकडून १७ लाख वसुलीचे आदेश

येनापूर धान खरेदी केंद्रावरील प्रकार

गडचिरोली : यावर्षीच्या खरीप हंगामात शासनाच्या किमान आधारभूत किमतीनुसार शेतकऱ्यांकडून धान खरेदी करताना चामोर्शी कृउबा समितीच्या येनापूर केंद्रावर 260.67 क्विंटल अधिकचा धान खरेदी करण्यात आल्याचे तपासणीत दिसून आले. त्यामुळे दंडासह एकूण 17 लाख 7 हजार 129 रुपये वसुल करण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले.

जिल्हा मार्केटिंग कार्यालयांतर्गत कार्यरत असलेल्या येनापूर केंद्राला गेल्या 7 फेब्रुवारी रोजी जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांनी भेट देऊन तपासणी केली. त्यात केंद्रावरील काही त्रुटी आढळून आल्या. जिल्हाधिकाऱ्यांना सादर केलेल्या तपासणी अहवालात येनापूर केंद्रावर पोत्यांचे वजन हे शासन नियमानुसार (अपेक्षित वजन- पोत्याच्या वजनासह धानाचे वजन 40.600 किलोग्रॅम) ठरवून दिलेल्या वजनापेक्षा प्रतिपोते जवळपास 2 किलो जास्त खरेदी केल्याचे आढळून आले.

या त्रुटीसंदर्भात येनापूर केंद्राला कारणे दाखवा नोटीस बजावून स्पष्टीकरण मागवण्यात आले. त्यात त्यांनी दिलेले स्पष्टीकरण समाधानकारक आणि संयुक्तिक नसून साशंकता निर्माण करणारे आढळले. त्यामुळे शेतकऱ्यांकडून अधिकचा धान खरेदी करून शेतकऱ्यांची आणि शासनाची दिशाभूल केल्याचे स्पष्ट होत असल्याचे सांगत जेवढा अधिकचा धान खरेदी केला त्याच्या तीन पट अधिक रक्कम वसुल करण्याचे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले. त्यानुसार एकूण 17 लाख 7129 रुपये येनापूर खरेदी केंद्राकडून वसुल करण्याचे आदेश जिल्हाधिकारी संजय मीना यांनी दिले.