गडचिरोली : विदर्भात मोठ्या संख्येने असलेल्या आदिवासी समाजाची विशिष्ट संस्कृती, परंपरा आहे. त्यांच्या पेहरावापासून तर भाषेपर्यंत अनेक बाबी आता बदलल्या असल्या तरी जुनी आदिवासी संस्कृती कशी आहे, याची झलक नवीन पिढीला दाखविण्याचा प्रयत्न एका मॅाडेलिंग शो च्या माध्यमातून गडचिरोलीत करण्यात आला. विशेष म्हणजे यात विदर्भातील आणि राज्यातील अनेक जिल्ह्यांसह इतर राज्यातील स्पर्धकही सहभागी झाले होते.
गोंडी राणी मनिषा प्रस्तुत ‘कोया किंग आणि क्विन कल्चर मॉडेलिंग’ या स्पर्धेचे आयोजन आरमोरी मार्गावरील सुमानंद सभागृहात केले होते. आदिवासी वुमेन्स फेडरेशन (नारी शक्ती संघटना) जिल्हा शाखा गडचिरोली, मिस इंडिया 2021 मनिषा मडावी आणि इतर आदिवासी सामाजिक संघटनांच्या संयुक्त विद्यमाने ही स्पर्धा प्रथमच गडचिरोलीत झाली. काळाच्या ओघात लोप पावत असलेली आदिवासी संस्कृती लोकांसमोर आणून त्या संस्कृतीचे संवर्धन करणे, जल, जंगल, जमीन आणि नैसर्गिक साधनसंपत्ती, साहित्याचे रक्षण आणि त्याचे महत्व समोर आणने हा या स्पर्धेच्या आयोजनामागील उद्देश असल्याचे आयोजकांनी सांगितले.
स्पर्धेचे उद्घाटन अन्न व औषध प्रशासन मंत्री धर्मरावबाबा आत्राम यांच्या हस्ते झाले. यावेळी विशेष अतिथी म्हणून आ.डॉ.देवराव होळी, माजी जि.प.अध्यक्ष भाग्यश्री आत्राम, माजी आमदार हरिराम वरखडे, काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस डॉ.नामदेव किरसान, माजी नगराध्यक्ष योगिता पिपरे, समाजकल्याण उपायुक्त डॉ.सचिन मडावी, डॉ.चंदा कोडवते, डॉ.विवेक आत्राम, डॉ.चेतन कोवे, डॉ.सोनल कोवे, शीतल ताराम, डॉ.शामगोंडा, डॉ.प्रवीण किलनाके, माजी नगरसेवक गुलाब मडावी आदी अनेक जण उपस्थित होते.
परीक्षक म्हणून डॉ.प्रा.नरेश मडावी, मारोतराव इचोडकर, सुवर्णा वरखडे, यशोधरा उसेंडी यांनी काम पाहिले. विशेष आकर्षण म्हणजे अभिनेत्री, दिग्दर्शक तृप्ती भोईर व विशाल कपूर यांनीही याप्रसंगी उपस्थित राहून स्पर्धकांचा उत्साह वाढविला. या स्पर्धेत मध्यप्रदेश, छत्तीसगड, तेलंगणासह महाराष्ट्रातील अमरावती, लातूर, चंद्रपूर, गडचिरोली, यवतमाळ, नागपूर, भंडारा, गोंदिया जिल्ह्यातून 62 स्पर्धक सहभागी झाले होते.
स्पर्धेचे संचालन सागर आत्राम आणि अन्नपूर्णा मेश्राम यांनी केले. स्पर्धा यशस्वी करण्यासाठी जयश्री येरमे, लक्ष्मी कन्नाके, जगदीश मडावी, खुमेद्र मेश्राम, समीर भजे, सचिन मेश्राम, गौतम पुंडगे यांनी सहकार्य केले. याशिवाय रेखा तोडासे, नेहा गेडाम, वंदना मडावी, मालता पुडो, अर्चना मडावी, मृणाल मेश्राम, अंजली कोडापे, कविता मेश्राम, संगीता गोटा, सुनिता जुमनाके, ज्योती जुमनाके, गीता उईक, शीतल मेश्राम, विना उईके, प्रोहिना येरमे, मंगला सलाम, विद्या दुगा यांनीही मदत केली.
विविध गटातून हे स्पर्धक ठरले विजेते
या स्पर्धेतील मुलांच्या गटातून रितू मरसकोल्हे विजेता ठरला, तर वैष्णवी पेंद्राम आणि वेदिका कतलाम हे उपविजेता (रनरअप) ठरले. मिसेस गटातून कविता मेश्राम (तेलंगाणा) विजेत्या, तर शितल कवदेती (नरखेड) आणि योगिता शेडमेक (भामरागड) उपविजेत्या ठरल्या. मिस्टर गटात निलेश उईके विजेता, तर अनुप मांझी आणि कनाद मेश्राम हे उपविजेते ठरले. मिस गटात आंचल धुर्वे विजेती तर जयश्री करंगामी आणि प्रिती मेश्राम उपविजेत्या ठरल्या.