यावर्षी हमीभाव खरेदी केंद्रांवर स्वीकारणार शेतकऱ्यांचा हेक्टरी ३३.९३ क्विंटल धान

गडबड टाळण्यासाठी काय उपाययोजना, ऐका

गडचिरोली : शेतकऱ्यांकडील धानाची हमीभावाने खरेदी करण्यापूर्वी आॅनलाईन नोंदणी करणे गरजेचे आहे. त्यासाठी असलेल्या अॅपला अपग्रेड करण्याचे काम पूर्ण झाले आहे. त्यामुळे गडचिरोली जिल्ह्यात सोमवारपासून धान खरेदीला वेग येणार आहे. विशेष म्हणजे यावर्षी धानाचे उत्पादन जास्त असल्याचा अहवाल कृषी विभागाने दिल्यामुळे हेक्टरी ३३.९३ क्विंटल धान स्वीकारल्या जाणार आहे.

गेल्यावर्षी हेक्टरी उत्पादकता २९.३७ क्विंटल ग्राह्य धरून त्याप्रमाणे शेतकऱ्यांकडील धान स्वीकारण्यात आला होता. यावर्षी पीकांची स्थिती गेल्यावर्षीपेक्षा चांगली असल्याचे कृषी विभागाने पीक कापणी अहवालात स्पष्ट केले. त्यामुळे हेक्टरी ३३.९३ क्विंटल एवढी उत्पादकता ग्राह्य धरून शेतकऱ्यांचा धान स्वीकारल्या जाणार असल्याचे आदिवासी विकास महामंडळाचे प्रादेशिक व्यवस्थापक मुरलीधर बावणे यांनी सांगितले. आदिवासी विकास महामंडळाच्या गडचिरोली प्रादेशिक कार्यालयाअंतर्गत ५४ खरेदी केंद्र शेतकऱ्यांचा धान खरेदी करण्यासाठी सज्ज झाले असल्याचेही त्यांनी सांगितले.

धान खरेदीत शेतकऱ्यांच्या नावावर व्यापाऱ्यांचा धान येणार नाही आणि कोणतीही गडबड होणार नाही यासाठी अनेक उपाययोजना केल्या असल्याचेही यावेळी प्रादेशिक व्यवस्थापक बावणे यांनी सांगितले.